no images were found
‘प्रिन्स शिवाजी’ च्या बी. फार्मसी काॅलेजला मान्यता
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी १९२० मध्ये स्थापन केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून गौरविलेल्या श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या उचगांव येथील शिक्षण संकुलातील ‘न्यू काॅलेज ऑफ फार्मसी’ या काॅलेजमधील बी. फार्मसी डिग्री कोर्सला फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय), नवी दिल्ली या शिखर परिषदेने मान्यता दिली.
“उच्च दर्जाच्या मोड्यूलर लॅब, स्मार्ट क्लासरूम, अद्ययावत ग्रंथालय, उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक, माफक दरात होस्टेल व बस सुविधा अशा सर्व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असल्यानेच या काॅलेजला ‘पीसीआय’च्या अतिशय काटेकोर तपासणी प्रक्रियेतून एकही त्रुटी न येता मान्यता मिळाली आहे”, असे संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
“बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे संस्थेचे ब्रीद आहे. बहुजन समाजातील होतकरू मुलांना शिक्षणाच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देणाऱ्या आमच्या संस्थेच्या या बी. फार्मसी काॅलेजमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील व जागतिक पातळीवरील नामांकित औषधनिर्माण कंपन्यांमध्ये संशोधन, निर्मिती, क्लिनिकल चाचण्या, पृथक्करण, मार्केटिंग आदी पातळ्यांवर करिअर घडविण्याची उत्तम संधी प्राप्त होणार आहे”, असे संस्थेचे विकास अधिकारी डाॅ. संजय दाभोळे यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी न्यू काॅलेज ऑफ फार्मसीमधील बी. फार्मसीचे प्रवेश उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डाॅ. सचिन पिशवीकर यांनी केले.
सदर बी. फार्मसीच्या मान्यतेसाठी संस्थेचे व्हा. चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक वैभव नायकवडी यांचे सहकार्य लाभले.
पत्रकार परिषदेस डाॅ. रविंद्र कुंभार, प्रा. विक्रम गवळी आदी उपस्थित होते.