no images were found
मी माझ्या समर्थक आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो – उद्धव ठाकरे
मुंबई : भाजपसोबत मी पॅचअप करु शकलो असतो, पण ते माझ्या नीतीमत्तेत बसत नव्हतं. २०१४ पासून ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? हा प्रश्न आहे. मी त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, त्यामुळे मी माझ्या समर्थक आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले होते, त्यांना डांबून ठेवून काय करणार होतो? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या बैठकीत केला.
दुसरीकडे, शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीची समीकरणे बदलणार असून लोकसभा निवडणुकीत वाकचौरे हे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात.
मी भाजपशी पॅचअप करु शकलो असतो, पण माझ्या नीतीमत्तेत ते बसत नव्हतं, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं. २०१४ पासून ज्यांनी फसवलं त्यांच्यासोबत कसं जाणार? असा सवाल त्यांनी ठाकरे गटाच्या बैठकीत केला.
यापूर्वी देखील युती संदर्भात अशा प्रकारची विधानं ठाकरे कुटुंबीयांकडून करण्यात आली आहेत. याच कारणास्तव शिवसेना-मनसे युती होऊ शकलेली नाही. मी मनसेशी युती केली, तर ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रक्त सांडलं आहे, ते काय विचार करतील, असं ठाकरे एका खाजगी बैठकीत म्हणाले होते. कार्यकर्त्यांना नाराज करायचे नसल्याने ठाकरेंनी अशा युती करणं टाळल्याचं दिसतं.
त्यांच्यासाठी मी काय कमी केलं होतं? जुने निष्ठावंतच जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा वाईट वाटतं. तुमच्या पैकी कुणाला जायचं असेल तर तुम्हीही खुशाल जाऊ शकता, असंही उद्धव म्हणाले.