no images were found
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासासाठी 120 कोटींचा निधी – उद्योगमंत्री उदय सामंत
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव औद्योगिक क्षेत्रातील मुख्य चौपदरी रस्त्याचे दुभाजक उचलणे, फुटपाथ व आवश्यक डांबरीकरणासह मजबुतीकरण व पुर्नअस्तीकरण करणे तसेच कागल-हातकणंगले, गोकुळ-शिरगाव व शिरोली पाणी पुरवठा करणाऱ्या उदंचन केंद्र सिद्धनेर्ली व जलशुध्दीकरण केंद्र कागल येथील पंपींग मशिनरी बदलणे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते म्हणाले, कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी तसेच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करुन विविध विकास कामांसाठी 100 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र 120 कोटी रुपये विविध कामांसाठी मंजूर केले आहेत. यातील काही कामांचे आज भूमिपूजन होत आहे. तसेच येथील फायर स्टेशनसाठी 13 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे, तेही काम लवकरच सुरु होईल. यावेळी मंचावर खासदार धनंजय महाडिक, खासदार धैयशील माने, आमदार ऋतुराज पाटील, गोशिमाचे अध्यक्ष दिपक चोरगे व इतर पदाधिकारी, मुख्य अभियंता नितीन वानखेडे, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता अजयकुमार रानगे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात एखाद्या विषयासाठी लोकप्रतिनिधी एकत्र आल्यास निश्चितच त्या जिल्हयाचा विकास गतीने होतो. मुळात उद्योग विकासासाठी बळ देणारी सर्वांची मानसिकता हवी. कोल्हापूरात लोकप्रतिनिधींनी चांगला पाठपुरावा करुन उद्योग विकासाला चालना दिली आहे, असे श्री.सामंत पुढे म्हणाले. राज्यात आत्तापर्यंत 7 हजार 300 कोटी रुपये उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून दिले गेले आहेत. आपण सर्व मिळून सामूहिक प्रयत्नातून जिल्हयात चांगले उद्योग आणूया, असे बोलून त्यांनी उपस्थितांना कामगार नेमताना प्राधान्याने स्थानिकांना न्याय द्या, असे आवाहन केले. ते म्हणाले, जर स्थानिक कामगार म्हणून आले तर एमआयडीसी परिसराचा विकासही गतीने होईल. नेहमीच स्थानिक पातळीवर अनेक प्रकारचे रोष पहायला मिळतात, तेही यामुळे दूर होतील. स्थानिक आणि उद्योग व्यावसायिक यांच्यात सहसंबंध सुधारुन कटुताही संपुष्टात येईल. तसेच कंपनीचा सीएसआर खर्च करत असताना प्राथमिक शिक्षण व आरोग्याला महत्त्व द्या, अशा सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या.
खासदार धनंजय महाडिक यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या निधीबद्दल आभार व्यक्त करुन हा निधी आजपर्यंतचा सर्वात जास्त निधी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जिल्हयात स्वकतृत्ववान उद्योजक आहेत. अनेक मोठ मोठे ब्रॅण्ड असलेले उद्योग जिल्हयात आणून आता आधुनिक पद्धतीची एमआयडीसी तयार करु.
खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्हा छत्रपती शाहू महाराजांचा उद्योग उभारणीचा वारसा पुढे घेवून जाणारा जिल्हा असल्याचे मत व्यक्त केले. जिल्हयाला 100 वर्षांचा उद्योग व्यवसायाचा अनुभव असून जगातील मोठमोठ्या कंपन्यांना येथून पार्टस तयार करून दिले जातात, असे ते पुढे म्हणाले. राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेला वारसा पुढे नेत कोल्हापूर विकासाकडे वाटचाल करीत आहे.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राचा विकास खऱ्या अर्थाने आता गती घेतोय, येथील स्थानिकांच्या हितासाठी पाहिजे ते योगदान देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांनी केले