
no images were found
प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळेच शहरातील क्रीडांगणांची दुरावस्था : श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : (प्रतिनिधी) कोल्हापूर हे कलानगरीसह क्रीडानगरी म्हणून ओळखले जाते. या क्रीडानगरीच्या मातीतून विविध क्रीडा प्रकारातून घडलेल्या नामवंत खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करीत चमकदार कामगिरी केली आहे. अशा क्रीडानगरीत उपलब्ध असणाऱ्या मैदानांची दुरावस्था होणे हे प्रशासनाचे अपयश असून, यातून प्रशासनाचा निष्क्रियपणा दिसून येत आहे. त्यामुळे तात्काळ या मैदानांची दुरावस्था दूर करून शहरातील मैदाने खेळाडूंच्या सरावा लायक सुस्थितीत करून देण्यात यावीत, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनीमहानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) सन २०२२-२३ मधून सासणे मैदान येथे वॉकिंग ट्रॅक व विद्युत व्यवस्था करणे या कामास रु.७० लाखांचा निधी मंजूर झाला असून, प्रस्ताविक कामाची पाहणी आज श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली. यावेळी मैदानाची झालेली दुरावस्था पाहून श्री.क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
यावेळी मंजूर निधीतून होणाऱ्या कामाचा आढावा श्री.राजेश क्षीरसागर यांनी घेतला सासणे मैदानाच्या सभोवताली हा वॉकिंग ट्रॅक विकसित केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली. याबाबत सूचना देताना श्री.क्षीरसागर यांनी वॉकिंग ट्रॅकमुळे मैदानाचा आकार कमी होणार नाही याची दक्षता घ्या. तात्काळ मैदानाचे सपाटीकरण करण्यासाठी उपाययोजना करा. लवकरात लवकर मैदान सरावा लायक करून खेळासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, सासणे मैदानाची दुरावस्था दूर करून मैदान खेळण्यालायक करावे अशी भागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधीनी मागणी केली होती. त्यानुसार आवश्यक सुचना महानगरपालिका प्रशासनास दिल्या आहे. या मैदानात वॉकिंग ट्रॅक विकसित करण्यात येणार असून त्यास रु.७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम होताना मैदान लहान होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह भागातील बॅडमिंटन खेळाडूंची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बॅडमिंटन कोर्टसाठी रु.साडेचार कोटींचा निधी प्रस्ताव तयार करण्यात आला असून, शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. भागातील नागरिकांची, खेळाडूंच्या सूचनांचा विचार होवूनच वॉकिंग ट्रॅक विकसित केले जाणार आहे. याचा फायदा भागातील आबालवृद्ध व खेळाडूंना होईल. आगामी काळात मैदानाचे रूप बदल्याचे दिसेल, असे सांगितले.
पाहणी दरम्यान शिवसेना उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते, राज जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन शिंदे,माजी नगरसेवक निलेश देसाई, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपआयुक्त साधना पाटील, अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, आर्कीटेक्ट रणजीत निकम आदी उपस्थित होते.