
no images were found
पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत :- मुख्यमंत्री
मुंबई :- ‘महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘महाराष्ट्राच्या विचार व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली अशी ओळख निर्माण केली.
फुले – शाहू -आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन याचा त्यांचा व्यासंग होता. यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.