
no images were found
मार्गदर्शन शिबिरातून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील-जिल्हाधिकारी
कोल्हापूर : एकाग्रता ठेवा.. मोठं स्वप्न बाळगा.. आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्दीनं सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश मिळते, असा विश्वास व्यक्त करुन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या मार्गदर्शन शिबिरातून अनेक प्रशासकीय अधिकारी घडतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जिल्ह्यातील युवक, युवतींसाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात झालेल्या या मार्गदर्शन सत्राचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी सुहास गाडे, भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी अन्नपूर्णा सिंग, भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्राच्या अधीक्षक प्रतिभा दीक्षित, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, अन्य विभागांचे अधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी असणाऱ्या अनेक प्रश्नांचे निरसन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, स्पर्धा परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांची नसून ही परीक्षा देणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांच्या मानसिकतेची कसोटी पणाला लावणारी परीक्षा असते. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मनापासून अभ्यास करायला हवा. त्याचबरोबर पालकांनीही मुलांची आवड जाणून घेवून त्यानुसार प्रोत्साहन द्यावे. तसेच घरी हलकेफुलके वातावरण ठेवावे, असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, स्वतःची आवड ओळखून डोळसपणे करिअर निवडा. शासकीय सेवेत येण्याची इच्छा बाळगताना प्रत्येक जबाबदारी किंवा कोणतेही काम आनंदाने पार पाडण्याची मानसिकता विद्यार्थी दशेतच रुजवून घ्या. आत्मविश्वास बाळगा. अभ्यासात सातत्य ठेवा. खडतर परिश्रम करुन निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हा.
सुहास गाडे यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरुप, अभ्यास पद्धती, परीक्षेचे टप्पे याबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, शालेय पाठ्यपुस्तकांचा अभ्यास चांगला करुन पाया मजबूत करा. याशिवाय वृत्तपत्रांसह अवांतर वाचन करुन ज्ञानाच्या कक्षा रुंद करा. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम वेगळा असतो. यासाठी त्या त्या परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन करुन त्यानुसारच तयारी करा. एकाच वेळी अनेक बाबींची, आजूबाजूला घडणाऱ्या महत्वाच्या गोष्टींची माहिती घ्या. चौकस वृत्ती ठेवा. प्रगल्भ व्हा. न्यूनगंड बाळगू नका, इंग्रजी भाषेच्या सरावासाठी इंग्रजी भाषेतील चित्रपट, मालिका पहा, इंग्रजी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा, डिक्शनरीचा वापर करा, असे सांगतानाच स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरीही खचून जाऊ नका. ‘युवा’ ही देशाची शक्ती आहे. प्रत्येक क्षेत्र महत्वाचे असून ज्या क्षेत्रात करिअर कराल त्या क्षेत्रात अव्वल बना आणि देशाचे सुजाण नागरिक बना, असा मूलमंत्र त्यांनी दिला.
अन्नपूर्णा सिंग म्हणाल्या, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणतीही गोष्ट मनापासून ठरवा. त्यासाठी खडतर परिश्रम करा. वेळेचे नियोजन करा. अभ्यासाची योग्य पद्धत निवडा. चालू घडामोडींची माहिती घ्या, यासाठी वृत्तपत्रे वाचण्यावर भर द्या.सुरुवातीला थोडा वेळ अभ्यास करा, प्रयत्नपूर्वक अभ्यासाची वेळ वाढवा, असे त्यांनी सांगितले. प्रतिभा दीक्षित यांनी प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राची माहिती दिली.
एकाच वेळी अनेक परीक्षांची तयारी कशी करायची, पदवी परीक्षा देताना स्पर्धा परीक्षा देता येते का, वेळेचे नियोजन कसे करायचे, मोबाईलचा वापर कसा टाळायचा असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. घरी वातावरण कसे ठेवायचे, पालकांची भूमिका काय असावी, असे प्रश्न पालकांनी विचारले. सर्वांच्या शंकांचे निरसन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक हरिष धार्मिक यांनी केले. आभार परिविक्षाधीन नायब तहसीलदार ऋतुराज निकम यांनी मानले.