no images were found
कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहिमेस 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर : राज्यातील युवक-युवतींच्या मागणीवर आधारित कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहिमेस दिनांक १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 या गुगल लिंकद्वारे आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या युवक युवतींना कौशल्याची मागणी सर्वेक्षण फॉर्म भरण्यासाठी प्रेरित करावे व त्यानुषंगाने आपल्या संस्थेमध्ये ड्राईव्ह घेण्यात यावा. जेणेकरुन जास्तीत-जास्त युवक युवती यामध्ये सहभागी होतील. याबाबत कोणतीही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर (दूरध्वनी ०२३१-२५४५६७७) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांच्यामार्फत गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून गुगल फॉर्मची लिंक https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 आहे. जिल्ह्यातील प्रती तालुका किमान 1 हजार युवक-युवतींचे त्याचप्रमाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातून किमान 10 हजार युवक-युवतींचे गुगल फॉर्म भरण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रत्येक फॉर्म भरताना जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतन कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी, शालेय/ महाविद्यालयीन शिक्षणातून गळती झालेले, शिक्षण सोडलेले, नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार तथापि समाजातील वंचित घटकातील उमेदवारांचा समावेश करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.
“कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” गुगल फॉर्म भरण्याकरिता जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतने, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, शिवाजी विद्यापीठ व इतर शैक्षणिक संस्थांनी सहकार्य करावे.