no images were found
डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा – आ. ऋतुराज पाटील
कोल्हापूर – शहरातील डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. त्यानुसार १६ पथके तयार करून सर्व प्रभागात धूर फवारणी, औषध फवारणी, स्वच्छता आदी कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील यांच्यासह आरोग्य विभाग अधिकारी, स्वच्छता विभाग अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी गाफील न राहता संपूर्ण यंत्रणा कामाला लावा, अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
नालेसफाई आणि कचरा उठाव याबाबत आ.पाटील यांनी माहिती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी जेसीबी आणि डंपर कमी पडत असल्याचे सांगितले. वाहने भाड्याने घ्या पण काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या.
यावेळी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत डेंगूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती दिली. सध्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. नागरिकांनी योग्य ती माहिती आणि सूचना देण्यात येत आहेत. आजपासून तात्काळ १६ पथक तयार करून सर्व प्रभागात जाऊन धूर फवारणी, औषध फवारणी, स्वच्छता करण्यात येणार आहे. एका प्रभागासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे बावड्यातून सुरुवात करत असून, येत्या १५ जुलैपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना दिली.
यावेळी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पुलकित खंबायते, कीटकनाशक विभागाचे आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, सोनाली शिंदे, आरोग्य विभाग अधिकारी, मुकादम, कर्मचारी आदी उपस्थित होते.