no images were found
श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार पालकमंत्री महोदयांनी नगरविकास साठी केली रु.८३.८८ कोटींची भरीव तरतूद
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पार पडली. या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेस भरीव निधीची तरतूद करण्याबरोबरच शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, शेंडा पार्क येथे फुटबॉल अॅकॅडमी साठी १६ एकर जागा, मर्दानी खेळाच्या जेष्ठ प्रशिक्षकांसाठी दरमहा मानधन देण्याची मागणी पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांचेकडे केली.
आज झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, २३ जानेवारी २०२० रोजी तत्कालीन पालकमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मारक कामी निधीस मान्यता दिली होती. त्यानंतर आपण ही मान्यता दिलेली आहे. परंतु, स्मारकाचा विषय आजतागायत रखडलेला असून, हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा, अशी मागणी केली. यावर पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांनी, स्मारकाच्या कामासाठी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत गौण खनिज विभागातून निधीची तरतूद केली असून, लवकरच कामास सुरवात करण्यात येईल अशी माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात दोन महानगरपालिका आणि १४ नगरपालिका असून, गत वर्षी नगर विकासासाठी रुपये ५२ कोटी निधी मंजूर होता. पण यावर्षी नगर विकास साठी प्रारूप आराखड्यात रु.४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि नागरिकांना अपुऱ्या पडणाऱ्या मुलभूत सोयी सुविधा यामुळे सदर निधी अत्यंत तोकड्या स्वरूपाचा त्यामुळे या निधीत वाढ करून वाढीव रुपये सुमारे रु.३८ कोटी निधी वाढीव स्वरूपात देण्याची मागणी श्री.राजेश क्षीरसागर यांनी पालकमंत्री महोदयांच्याकडे केली. यावर श्री.राजेश क्षीरसागर यांनी केलेली वाढीव रु.३८ कोटी निधीची मागणी विचारात घेवून प्रशासन सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३- २४ मध्ये नगर विकासासाठी वाढीव निधी देवून रुपये ८३.८८ कोटी इतका निधी मंजूर करण्याबाबत पालकमंत्री महोदयांनी मंजुरी दिली.
माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूर शहरातील शेंडा पार्क परिसरात १६ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करणे बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना प्रधान सचिव नवी -2 यांच्यामार्फत जिल्हा प्रशासनास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल ॲकॅडमी करण्यासाठी शासन अनुकूल आहे. कोल्हापूरातील अनेक खेळाडूंनी भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. अनिकेत जाधव सारखे युवा खेळाडू याच मातीत घडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील युवा खेळाडूंच्या खेळास चालना देण्यासाठी ही फुटबॉल अॅकॅडमी फायदेशीर ठरणार आहे. यासह ही फुटबॉल अॅकॅडमी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे जिल्ह्यासह आसपासच्या फुटबॉल खेळाडूंच्या खेळास तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होणार आहे. सदरची जागा अॅकॅडमी साठी योग्य असल्यामुळे सदरची १६ एकर जागा फुटबॉल अकॅडमी साठी प्रस्तावित करावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनास दिली.
यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा ते बारा मर्दानी खेळाचे जेष्ठ प्रशिक्षक- वस्ताद आहेत. शिवकालीन युद्धकला आणि मर्दानी खेळाच्या प्रसारासाठी त्यांनी आपले उभं आयुष्य वेचले आहे. या जेष्ठ प्रशिक्षकांची उतरत्या वयात हेलासांड होवू नये आणि त्यांनी केलेल्या कार्याच्या पोहच पावती म्हणून जिल्हा नियोजन समिती मधून दरमहा रु.१० हजार मानधन देण्याची मागणीही श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली.