
no images were found
गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेचा लाभ घ्यावा
कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागामार्फत 100 टक्के शासकीय अनुदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल पुरविणे योजना (ग्रामपंचायत) व अ,ब,क वर्ग नगरपालिका आणि छावणी क्षेत्र व महानगरपालिका क्षेत्रात सन 2007-08 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल व 500 रुपयांचे अनुदान दिले जाते.
या योजनेसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात 40 हजार रुपये व शहरी भागात 50 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदार ज्या जागेत गटई स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, छावणी बोर्ड किंवा महानगरपालिका यांनी त्यास भाड्याने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू, अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्यांची स्वमालकीची जागा असावी. अर्जदार यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा. एखाद्या लाभार्थ्यांला स्टॉलचा ताबा दिल्यानंतर त्या स्टॉलची देखभाल दुरुस्ती लाभार्थ्यांने स्वत: करणे आवश्यक राहील. गटई पत्र्याचे स्टॉल हे एका घरात एकाच व्यक्तीला दिले जाइल. स्टॉल वाटपाबाबतचे पत्र लाभार्थ्यांच्या फोटोसह स्टॉलमध्ये प्रथमदर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. एकदा गटई स्टॉलचे वाटप झाल्यानंतर या स्टॉलची विक्री करता येणार नाही, भाडे तत्वावर देता येणार नाही तसेच स्टॉलचे हस्तांतरण करता येणार नाही.
यापूर्वी ज्या कुटूंबाने या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांनी अर्ज करु नये. अधिक माहिती व अर्जासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.