no images were found
अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरास रु.३५४ कोटी निधी मंजुरीची शक्यता ; श्री.राजेश क्षीरसागर यांचा पाठपुरावा
कोल्हापूर : ( प्रतिनिधी )कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये ड्रेनेजची समस्या निर्माण झालेली आहे. शहरात अनेक ठिकाणी भुयारी गटर योजना अस्तित्वात नसल्याने प्रामुख्याने शहरातील ई वॉर्ड, उपनगरे आदी परिसरातील सांडपाणी ओपन गटारीमधून नाल्यात मिसळत आहे. याचा दुष्परिणाम पंचगंगा नदी सह रंकाळा व शहरातील इतर प्रमुख तलावांच्या पाण्यावर होवून प्रदुषणात वाढ होत आहे. याबाबत केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून शहरातील पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनिस्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर सादर करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी सुमारे २१५ कि.मी. पाईपलाईनची भुयारी गटर करणे, शहरात १०१ एम.एल.डी क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी आवश्यक रु.३५४ कोटी इतक्या रक्कमेचे स्वतंत्र तीन प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. याबाबत दोन दिवसांपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली आणि निधी मंजुर करावा अशी मागणी केली. यासह अव्वर मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती सोनिया सेठ यांच्याशीही चर्चा केली. सद्यस्थितीत सदर प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासन स्तरावर सादर करण्यात आले असून, लवकरच अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून कोल्हापूर शहरात जिथे भुयारी गटर योजना अस्तित्वात नाही त्या ठिकाणी भुयारी गटर करणे, शहरात मलनिःसारण केंद्र उभारणे आणि रंकाळा तलाव संवर्धन आणि पुनरुज्जीविकरणासाठी रु.३५४ निधी मंजूर होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती राज्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.