Home शासकीय नाचणी उत्पादनासोबतच प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक- राहुल रेखावार

नाचणी उत्पादनासोबतच प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक- राहुल रेखावार

2 second read
0
0
37

no images were found

नाचणी उत्पादनासोबतच प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक-  राहुल रेखावार

कोल्हापूर : राज्यातला पहिलाच उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग सन 2018 ला पन्हाळा तालुक्यात यशस्वी ठरल्यानंतर आता दरवर्षीच तालुक्यात उन्हाळी नाचणीचे उत्पादन घेतले जात आहे. चालू वर्षात आत्मा विभाग व महाबीज यांच्या माध्यमातून 23 एकरांवर बिजोत्पादनासाठी उन्हाळी नाचणीची लागवड झाली असुन यातील काही नाचणी प्रक्षेत्रांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नुकतीच पाहणी केली. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ चे औचित्य साधून राहूल रेखावार यांनी पाटपन्हाळा आणि काळजवडे येथील गणपती संभाजी पाटील आणि प्रकाश पाटील या नाचणी उत्पादकांच्या प्रक्षेत्रास भेट दिली. कृषी विभागाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत लाभार्थी विजय पाटील पोहाळे यांच्या प्रक्रिया केंद्रासही त्यांनी भेट दिली. शेतकऱ्यांनी नाचणी उत्पादनाबरोबरच व्यक्त प्रक्रिया करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले. कोल्हापूर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या सहाय्याने पन्हाळा तालुक्यात नाचणी खरेदी केंद्राची सुरवात करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची आर्थिक आवक वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक शेतकऱ्याने रेशीम लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेऊन लागवड करावी व आर्थिक उन्नती साधावी असेही त्यांनी सांगितले. महाबीजच्या माध्यमातून विविध पिकांचे बीजोत्पादन घेण्याचे आवाहन रेखावार यांनी केले. खरीप हंगामात वाढत चाललेल्या नाचणीच्या पेरा आणि त्या अनुषंगाने बियाणाची आवश्यकता ध्यानात घेऊन आत्मा विभाग, महाबीज, विभागीय कृषि संशोधन प्रकल्प, शेंडा पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने या भागात गेल्या पाच वर्षांपासून नाचणीचे उन्हाळी हंगामात उत्पादन घेतले जात आहे. पश्चिम भागातील एकूण ३८ शेतकऱ्यांनी २३ एकर क्षेत्रावर उन्हाळी नाचणी व २ एकर क्षेत्रावर वरी पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामातील नाचणीची उत्पादकता ८ ते १० क्विंटल प्रती एकर इतकी असून आत्मा अंतर्गत पीक प्रात्यक्षिक बाबीमधुन सन 2018 पासून उन्हाळी हंगामातील नाचणीची उत्पादकता सरासरी प्रती एकरी 16-18 क्विंटल इतकी मिळाली आहे.
पन्हाळा पश्चिम भागातील उन्हाळी नाचणी उत्पादक शेतकरी एकरी १६ ते 18 क्विंटल इतके भरघोस उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पन्हाळा भागात खरीप व उन्हाळी मिळून नाचणीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादित झालेली नाचणी जलद गतीने विक्री होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती घेऊन नाचणी खरेदीसंदर्भात मार्केटिंग फेडरेशन कोल्हापूर यांना सुचना केल्या. पन्हाळा तालुक्यात नाचणी खरेदी केंद्र सुरु झाल्यास नाचणीची लागवड वाढण्यास वाव मिळेल, असे नाचणी उत्पादकांनी जिल्हाधिकारी रेखावार यांना सांगितले. प्रगतशील शेतकरी मिलिंद पाटील यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांना उन्हाळी नाचणी उत्पादनाच्या
राज्यातल्या पहिल्या प्रयोगापाठोपाठ उन्हाळी वरी उत्पादनाच्या राज्यातला पहिल्या यशस्वी प्रयोगाबाबत आणि या प्रयोगासाठी सहकार्य केलेल्या तत्कालीन आत्मा अधिकारी, कृषि अधिकारी, शास्त्रज्ञ यांनी बजावलेल्या महत्वपूर्ण भुमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पन्हाळा तालुका कृषि अधिकारी डी. एस शिंगे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नासीर इनामदार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एस चौगुले, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. ए. पाटील, कृषि क्षेत्र अधिकारी फुलसिंग आडे, कृषि सहाय्यक मधु कुंभार, प्रगतीशील शेतकरी दिलीप चौगले, सर्जेराव पाटील, प्रकाश पाटील तसेच परिसरातील नाचणी आणि वरी उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…