no images were found
‘न्यू पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवली देशी वृक्षांची बीज बँक’
कोल्हापूर (प्रतिनिधी ): श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी ‘न्यू पॉलिटेक्निक निसर्ग संवर्धन क्लब’ तसेच Environmental Studies या विषयाच्या प्रोजेक्ट अंतर्गत नाविन्यपूर्ण व पर्यावरणपूरक संकल्पना राबवत देशी वृक्षांच्या बियांचे चिखलमाती व सेंद्रीय खत मिश्रित २७५० गोळे (Seed Balls) तयार केले. यात बहावा, करंज, कुंकुमवृक्ष, पांगारा, चिंच आदी वृक्षांच्या बीयांचा समावेश आहे. हे सर्व गोळे विद्यार्थ्यांनी गगनबावडा येथे पर्यावरण अभ्यास भेटीवेळी निसर्गामध्ये पाणथळ जागी रुजण्यास सोडले. पावसाळ्यात यातील किमान ७०% बीजांना अंकूर फुटतील आणि रस्ते विकास प्रकल्पामूळे तिकडे वृक्षतोड होत असतानाच विद्यार्थ्यांनी केलेले बीजारोपणाचे कार्य तेथील निसर्ग संवर्धनामध्ये हातभार लावेल, असा विश्वास मार्गदर्शक प्रा. प्रविण जाधव यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देशी वृक्षांच्या बियांचे १२५ बीज बँक (Seed Envelopes) तयार केले आहेत. त्यावर त्या झाडांचे शास्त्रीय व प्रचलित नाव आणि पर्यावरणीय फायदे लिहीले आहेत. त्यामध्ये बिजांसोबत वृक्ष संवर्धनाची महती सांगणारे व या बीजांचा उपयोग करण्यासाठीचे विनंती पत्रही समाविष्ट आहे. न्यू पॉलिटेक्निकला भेट देणाऱ्या अतिथींना हे Seed Envelope भेट देवून त्यांच्यामार्फत देशी वृक्षवाढीच्या चळवळीस हातभार लावण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प आहे. तसेच, यापुढे दुर्गम भागात जावून पर्यावरण संवर्धन व सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस निसर्ग संवर्धन क्लबचा अध्यक्ष विद्यार्थी क्षितीज गोरे याने बोलून दाखविला. या उपक्रमांसाठी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे आणि मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. संग्रामसिंह पाटील यांचे पाठबळ लाभले.