no images were found
प्रत्येक लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची निवड करा –जिल्हाधिकारी
कोल्हापूर : राज्यात शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची” हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी योजनांचा लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी परस्परांमध्ये योग्य समन्वय ठेवून आपल्या विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करावे व या अभियानांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना एकाच दिवशी प्रत्यक्ष शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित शासकीय योजनांची जत्रा अभियानांतर्गत विभाग प्रमुखाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री. रेखावार मार्गदर्शन करत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे व विविध विभाग प्रमुख तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अमोल शिंदे, विशेष कार्य अधिकारी अमित हुकिरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रेखावार पुढे म्हणाले की, प्रत्येक विभागाने त्यांना देण्यात आलेल्या फॉर्ममध्ये आपल्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती तसेच या अभियानांतर्गत लाभ देण्यात येणार असलेल्या लाभार्थ्यांच्या संख्याबाबतची दैनंदिन आकडेवारी भरुन द्यावी. प्रत्येक विभागाने त्यांच्या स्तरावरून जिल्हास्तरावर विभाग जनकल्याण कक्ष व तालुका स्तरावर तालुकास्तरीय जनकल्याण कक्षाची स्थापना करावी. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली असून सर्व विभागांनी स्थापन केलेल्या जनकल्याण कक्षामार्फत जिल्हास्तरीय जलकल्याण कक्षाला माहिती सादर करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी अधिनस्त असलेले कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील व त्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करुन ती यादी जिल्हा प्रशासनाला सादर करावी. दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्रपत्रात भरून रोजच्या रोज सादर करावा. ही सर्वेक्षण मोहीम उद्यापासून सुरु करुन 11 मे 2023 अखेरपर्यंत राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या.
जत्रा शासकीय योजनांची या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असले तरी सर्व विभाग प्रमुखांनी हे उद्दिष्ट किमान असून यापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या विभागामार्फत नियोजन ठेवावे व जास्तीत जास्त लाभार्थ्यांची माहिती द्यावी, असे जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी निर्देशित केले.
जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी जत्रा शासकीय योजनांची या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. सर्व प्रशासन मिळून सर्वसामान्यांना लाभ मिळवून देत असते. त्या त्या प्रक्रियेत सर्वसामान्य लोकांनीही सहभागी व्हावे, हा या योजनेचा उद्देश असल्याची माहिती मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव श्री. शिंदे यांनी दिली. तर या अभियानात किमान एक लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने ठेवावे. राज्यात राबविण्यात येत असलेले हे अभियान देशासाठी आदर्शवत ठरेल. यासाठी प्रयत्न केले जात असून यात कोल्हापूर जिल्ह्यानेही जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुकीरे यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे केले.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कांबळे यांनी “जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची” या अभियानाबद्दल माहिती दिली. हे अभियान राज्यात दिनांक 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तसेच या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे किमान उद्दिष्ट दिलेले असून प्रशासनाकडून यापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.