
no images were found
अभिनेत्री दिव्या पुगावकरने पत्रातून मांडली आनंदीची व्यथा…
स्टार प्रवाहवर ८ मे पासून सुरु होणाऱ्या मन धागा धागा मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुतकता आहे. स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. मन धागा धागा जोडते नवा ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकर या मालिकेत आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार असून अभिनेता अभिषेक रहाळकर सार्थकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. घटस्फोटित महिलांकडे लोकांचा पहाण्याचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असतो. समाज तर सोडाच पण घरच्यांकडूनही त्यांना खंबीर साथ मिळत नाही. आनंदीही त्यापैकीच एक. मनात अनेक गोष्टी असताना त्या मनमोकळेपणाने मांडू न शकणारी. आई-बाबांसमोर व्यक्त तर व्हायचंय आणि त्यासाठीच आनंदीने पत्रातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पत्रात आनंदी म्हणते…
घरी सुखरुप पोहोचले. आता तुम्ही म्हणाल मोबाईल असताना हे असं अचानक पत्र का लिहितेय. त्याचं काय आहे…नुकतीच मी आपल्या घरी असताना, सॉरी…आई म्हणते तशी माहेरी पाहुणी म्हणून आले असताना आईला माझी परिस्थिती सांगितली आणि आईने बोलणंच टाकलं.
आई अगं तू, मी समोर आल्यावर नजर ही वळवलीस… म्हणून हे पत्र. खूप बोलायचंय, मन मोकळं करायचंय, काही प्रश्न पडलेत ते ही विचारायचेत. तेव्हा ऐकलं नाहीस पण हे वाच. वाचलंस तर तू ऐकलंस असं वाटेल मला. वाचशील ना? आई, मुलगी जन्माला येते तेव्हा आई-वडील म्हणतात हे परक्याचं धन आहे.. लग्न झालं की सासरी जाणार तेच तुझं घर आणि भांडण झालं की सासरचे म्हणतात तुझ्या आई वडिलांच्या घरी परत जा.. पण माहेरी तिला आता थारा नसतो.. याचा अर्थ मुलगी जन्मापासून बेघर असते का? तू म्हणतेस ना जेव्हा एखादी मुलगी सासर सोडून माहेरी परत येते तेव्हा सगळे आपसात चर्चा करतात.. कुणाला आश्चर्य वाटतं , कोणाला वाईट वाटतं , कोणाला आनंदही होतो. . बहुतेक जण मुलीलाच दोष देतात… असेल हिच्यातच काहीतरी उणीव.. नवऱ्याशी चांगलं वागत नसेल.. घरात नीट काम करत नसेल.. मोठ्यांचा मान ठेवत नसेल.. नाहीतर असेल लग्नाआधी कुठेतरी प्रकरण.. काहीही माहिती नसताना प्रत्येक जण काही ना काही कारण शोधतो.. . पण ती मुलगी कुठल्या दिव्यातून जाते आहे याचा कोणीच का विचार करत नाही?