no images were found
‘महर्षी शिंदे बहुजनवादी राजकारणाचे प्रणेते; अशोक चौसाळकर
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे बहुजनवादी राजकारणाचे प्रणेते होते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले ते शिवाजी विद्यापीठातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने आयोजित महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जयंती निमित्त ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि विविध चळवळी; या विषयावरील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे परिसंवादात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या प्रसंगी बोलताना पुढे ते म्हणाले की, जहाल आणि मवाळ सामाजिक सुधारणांचा समन्वय शिंदे यांच्या राजकीय दृष्टीत दिसून येतो. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात राष्ट्रीय एकात्मतेला शिंदे यांनी महत्त्व दिले. या परिसंवादात डॉ. अवनीश पाटील यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि धर्मसुधारणा चळवळ या विषयावर मांडणी केली.
ते म्हणाले की, भारताच्या उदारधर्म चळवळीतील महर्षी शिंदे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचे एकंदर जीवनकार्यच हे धर्मकार्य होते. भारताच्या धर्मसुधारणा चळवळीमध्ये महर्षींच्या कार्याला मोठी प्रतिष्ठा होती. तसेच श्री. रमेश चव्हाण यांनी महर्षी शिंदे आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी या विषयावर मांडणी केली. ते आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, महर्षी हे सकलजनवादी होते. ते त्यागमूर्ती आणि प्रार्थनामूर्ती होते. तसेच अस्पृश्यता निवारणाचा संस्थात्मक व कृतीचा पाया महर्षींनी घातला. शिंदे हे सत्य, स्वातंत्र्य, धर्म यांचे प्रवक्ते होते. या परिसंवादाचे प्रास्ताविक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अभ्यासनाचे समन्वयक प्रा. (डॉ.) रणधीर शिंदे यांनी केले आहे. पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केला. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे तर आभार डॉ. सुखदेव एकल यांनी मानले. या परिसंवादास सौ. वैशाली चव्हाण, प्रा. उंदरे, डॉ. नवनाथ गुंड, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. संदीप दळवी, डॉ. तानाजी काळुंगे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ.सुभाष पाटील, डॉ.विजया वाडकर तसेच विभागातील संशोधक विद्यार्थी, एम.ए. चे विद्यार्थी उपस्थित होते.