no images were found
एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार– संजय राऊत यांचा मोठा दावा
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकार जाण्याचं भाकीत केलं आहे. राज्यातील सरकार येत्या 15 ते 20 दिवसात कोसळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. आजही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. तसेच पाकिस्तानचा मुद्दा वगळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका जिंकूनच दाखवाव्यात, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.
छगन भुजबळ जे बोलतात ते सत्य आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत सुरू आहेत. पडद्यामागे सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. असं संजय राऊत म्हणाले.
हे मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपला जे हवं ते साध्य करण्यात ते अपयशी ठरले आहेत. त्यांना आमचं सरकार पाडायचं होतं, त्यासाठी त्यांचा वापर केला. ते काम पूर्ण झालं. भाजपला ताकद देण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, असं राऊत म्हणाले.