
no images were found
‘दृष्टी’ या उपक्रमांतर्गत जपानी चित्रपट व परदेशी खाद्यपदार्थ प्रदर्शन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग व डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जपानी
चित्रपट व परदेशी खाद्यपदार्थ प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्यावतीने ‘दृष्टी’ या
उपक्रमांतर्गत मंगळवारी दि. १८ एप्रिल, २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वि. स. खांडेकर सभाग्रह, भाषा भवन, शिवाजी विद्यापीठ येथे ‘रि-लाइफ’
(ReLIFE) हा जपानी (इंग्रजी उपशीर्षकासह) चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘रि-लाइफ’ हा एक काल्पनिक वैज्ञानिक चित्रपट आहे. अपयशाने खचून न जाता, आपली ताकद ओळखून कशाप्रकारे आयुष्याची नव्याने सुरवात करता येते हे रंजक पद्धतीने दाखवणारा हा प्रत्ययकारी चित्रपट तरूणांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. विदेशी भाषा विभागातर्फे सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमांचा एक भाग म्हणून ‘दृष्टी’ या उपक्रम चालवला जातो. या अंतर्गत विविध विदेशी भाषेतील चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसहित दाखवले जातात. अशा चित्रपटांच्या मदतीने जगभरातील विविध देशातील भाषा व संस्कृतींचा परिचय होतो. त्यातून एक व्यक्ती म्हणून जगातील मानवी समुदायांकडे पाहण्याची व्यापक, बहुसांस्कृतिक दृष्टी प्राप्त होते.
चित्रपट प्रदर्शनानंतर डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटी, कोल्हापूर या संस्थेतर्फे विदेशी खाद्यसंस्कृतीचा परिचय करून देण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हॉस्पिटॅलीटी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या रशियन सँडवीच, फ्रेंच दानिश पेस्ट्री, जर्मन स्टोलन ब्रेड, जपानी ग्रीन टी शेक अशा परदेशी पदार्थांचा अगदी माफक दारात आस्वाद घेता येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी या उपक्रमाचा आनंद व आस्वाद
घ्यावा, असे आवाहन विदेशी भाषा विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी केले आहे.