no images were found
सामान्य लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचवून समाधान देण्याचा प्रयत्न -मुख्यमंत्री
कोल्हापूर : राज्यातील सर्वसामान्य लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण विभागाकडून दिवाळी, गुढीपाडवा, रमजान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व सण उत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. त्याची तत्परतेने अंमलबजावणी करुन या अंतर्गत रवा, चनाडाळ, साखर व तेल हे साहित्य शंभर टक्के प्रत्येक जिल्ह्यात पोहोचलेले असून त्यातील 50 ते 60 टक्के वाटप झाले आहे. याप्रकारे शासनाने सण उत्सवाच्या काळात सर्वसामान्य लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करुन लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंदाचा शिधा व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज सायंकाळी संवाद साधला, त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे मार्गदर्शन करत होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव श्री. वाघमारे हे मुंबई येथून उपस्थित होते.
शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आनंद निर्माण करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. शासन लोककल्याणकारी योजना राबवत असून या योजना राबवत असताना काही अडचणी येत असतील किंवा त्रुटी राहिल्या असतील तर त्या कळवाव्यात त्याबाबत दुरुस्ती करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगून शासकीय यंत्रणेने सर्वसामान्यां साठी असलेल्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही सूचित केले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या शिधा जिन्नसांचे वितरण पात्र लाभार्थ्यांना होत आहे किंवा कसे, याबाबत लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे तसेच रास्तभाव दुकानांमार्फत योजनेचा लाभ घेताना अडचणी/समस्या येत असल्यास त्या जाणून घेणे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे हा कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे प्रातिनिधिक स्वरुपात पाच लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा हे किट वाटप करण्यात आले. त्यानंतर 34 जिल्ह्यातील आनंदाचा शिधा व अन्य योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सर्व जिल्ह्यातून लाभार्थ्यांनी आनंदाचा शिधा उत्कृष्ट दर्जाचा असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तसेच याच पद्धतीने शिधा देण्याची मागणी केली.