
no images were found
७५ हजार लाभार्थ्यांना मिळणार योजनांचा लाभ; ‘शासकीय योजनांची जत्रा’
सरकारी योजनांचा लाभ पात्र लोकांना मिळवून देण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’ होणार आहे. किमान 75 हजार लाभार्थ्यांना या शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविला जाणार असून, जिल्हयातील शेवटच्या गरजू लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. प्रत्येक यंत्रणेचा या जत्रेमध्ये सहभाग राहणार आहे. यंत्रणेने या जत्रेच्या दृष्टीने काम करीत असलेल्या कामांचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षाला दररोज सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत
सरकारी योजनांचे लाभार्थी असणाऱ्यांना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तीन दिवस सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच ठिकाणी राहणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे.जत्रेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना थेट जनतेशी संवाद साधता येणार आहे. यामुळे जनतेच्या समस्या जवळून पाहता येणार असल्याने त्या समस्येवर उपाययोजना करता येणार आहेत.
प्रशासन, शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या राहणार नाहीत. हे हेरुन शासकीय योजनांची अंमलबजावणी गतीमान करण्यासाठी एकाच छताखाली सर्व अधिकारी-जनता जत्रेच्या रुपात आणून जनतेला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.