
no images were found
आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी प्रलोभनांना बळी पडू नका- आशा उबाळे
कोल्हापूर : आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने, नियमानुसार व पूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने राबविली जात असून प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. पालकांनी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही दलाल / संस्था यांच्या प्रलोभनांना बळी न पडता पालकांनी शाळा प्रवेशाच्या बाबतीत दक्ष राहून विहीत मुदतीत पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामधील २५ टक्के कोट्यातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील RTE Portal या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील ३२५ शाळांमधील ३ हजार २७० जागांसाठी एकूण ४ हजार ९६१ ऑनलाईन अर्ज पालकांकडून प्राप्त झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दि. ५ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे येथे काढण्यात आली आहे.
लॉटरीद्वारे निश्चित झालेली पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी, तसेच पुढील प्रवेश फे-यांसाठी प्रतिक्षा यादी RTE पोर्टलवरील होमपेजवर दि. १२ एप्रिल २०२३ रोजी अपलोड करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचा कालावधी दि. १३ ते दि. २५ एप्रिल २०२३ असा आहे. प्रथम प्रवेश फेरीसाठी निवडलेल्या पालकांच्या मोबाईलवर दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारनंतर शाळेच्या नावासह संदेश पाठविले जातील. मात्र पालकांनी संदेशावर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील Application Wise Details अथवा SELECTED व WAITING LIST या टॅबवर जाऊन आपल्या फॉर्म नंबरद्वारे खात्री करावी. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी RTE पोर्टलवरील Allotment Letter सह प्रथम पंचायत समिती / महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. पडताळणी समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत संबंधित शाळेमध्ये जाऊन बालकाचा प्रवेश घ्यावा. विहीत कालावधीत शाळांमध्ये प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फे-यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही. ज्यांचे नाव WAITING LIST मध्ये असेल अशा अर्जांसाठी प्रवेशाची पुढील फेरी काढण्यात येईल, असेही श्रीमती उबाळे यांनी कळविले आहे.