
no images were found
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचे छापे
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. सत्यंद्र सिंह यांच्यापाठोपाठ दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरात आता सीबीआय पोहोचली आहे. सीबीआयचे पथक घरी पोहोचल्याची माहिती सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. हे प्रकरण दिल्लीतील एक्साईज पॉलिसी संदर्भातील आहे. दिल्लीमध्ये एक्साइज घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 20 ठिकाणांवर छापे टाकले आहे. याच साखळीत सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरी देखील छापा टाकला आहे.
सीबीआयच्या छाप्याबद्दलची माहिती स्वत: मनिष सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. “सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणार्यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून पहिल्या क्रमांकाचा बनलेला नाही,” असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्या ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी लिहिलं आहे की, “आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही.”
पुढच्या ट्वीटमध्ये मनिष सिसोदिया म्हणतात की, “दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.”
दिल्लीच्या उपराज्यपालांनी गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणात कथित अनियमिततेच्या आरोपावरुन सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. नवीन उत्पादन शुल्क धोरण नियमांचे उल्लंघन करुन, त्यांच्या इच्छेनुसार तयार करण्याचे, अंमलबजावणी करण्याचे आणि त्यात मनमानी बदल करण्यासाठी कोणकोणत्या सरकारी अधिकारी आणि प्रशासकांनी मुख्य भूमिका बजावली याची माहितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना दिले होते.