
no images were found
बंगाली सुवर्ण कारागिरांना नाहक त्रास,संरक्षण गरजेचे – कुलदीप गायकवाड
कोल्हापूर – स्थानिक अविघातक घटकांमुळेच बंगाली कामगार दागिने घेऊन पलायन करणे, या सारख्या अप्रपृत्तीला प्रोत्साहन मिळते. अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी बंगाली कामगारांचे संरक्षण गरजेचे असल्याचे प्रतिपादन बंगाली सुवर्ण कारागीर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
गेल्या काही दिवसांमध्ये बंगाली कामगार दागिने घेऊन पळून जाण्याच्या घटना समोर आल्या. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुळात आपल्या पारंपरिक व्यवसायाला आणखी वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी बंगाली कामगारांचेही मोठे योगदान आहे. त्यांनीही येथे येऊन शहराशी एकरूप होत ते कायमचेच येथील झालेत. काहीनी स्थावर मालमत्ताही केली आहे. असोसिएशनच्या माध्यमातून एकत्र येऊन आपले सण, उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करीत आहे. यामध्ये एखाद-दुसऱ्या घटकाच्या चुकीच्या वागण्याचा फटका सर्वांना भोगावा लागत आहे.
बंगाली कारागीर असोसिएशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच कोरोना काळात मदत, रक्तदान शिबिर, दुर्गा महोत्सव या व अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांची शहराशी नाळ जोडली गेली आहे. मात्र या कारागिरांना काम करताना अडचणी येत आहेत.
श्री. गायकवाड म्हणाले, स्थानिक अविघातक घटकच अशा अपप्रवृत्तीला खतपाणी घालतात. जसे की माजी नगरसेवक, खंडणी बहाद्दर, खासगी सावकारी करणारे, हप्ता वसुली, वर्गणी मागायला येणाऱ्या घटकांकडून बंगाली कामगारांना नाहक त्रास दिला जातो. जबरदस्तीने रक्कम वसूल केली जाते. अशावेळी होणाऱ्या मानसिक त्रासातून चुकीचे पाऊल संबंधित कामगाराकडून उचलले जाते. या आणि व्यवसायातील घातक प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी लवकरच जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन या कामगारांना संरक्षण देण्याची मागणी करणार आहोत. अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक म्हणाले, असोसिएशनचे सभासद असले तरी सराफ व्यावसायिकांना विनंती की, त्यांनी काम देताना आपल्या जबाबदारीवर द्यावे. कामगार असोसिएशनचा सभासद असल्यास त्याचा येथील व गावाकडील पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर देईल. यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित सामंत यांच्यासह संचालक उपस्थित होते.