no images were found
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम दर्ग्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम दर्गा येथे समुद्रात नवीन हाजी अली तयार करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. माहीम समुद्रात अनधिकृतपणे जागा बळकावून कबर तयार करण्यात आली आहे.तिथे दर्गा तयार करण्यात येत असून आजूबाजूला अनधिकृत बांधकामही करण्यात आल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका यांना दिसलं नाही?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या जागेची पाहणी केली. तर मगदूम शाह बाबा दर्गाहचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी राज ठाकरे यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. राज ठाकरे म्हणतात त्या जागेवर दर्गा नाही. कबरही नाही. तिथे एक बैठक आहे. ती बैठक 600 वर्ष जुनी आहे. तसेच ती वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृतही आहे, असं सांगतानाच या बैठकीच्या आसपास जर अनधिकृत बांधकाम असेल तर ते जरूर तोडण्यात यावे. आमचा त्याला विरोध वा आडकाठी राहणार नाही, असं सोहेल खंडवानी यांनी स्पष्ट केलं आहे.