
no images were found
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार -आमदार ऋतुराज पाटील
मुंबई येथील आझाद मैदानातील आंदोलनस्थळी भेट
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या किमान वेतन तसेच अन्य मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या लढ्यात तुमच्या पाठीशी आहोत.
महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते आ.अजितदादा पवार यांनी अधिवेशना या प्रश्नाबाबत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले आहे.,अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. मुंबई येथील आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देवून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधन वाढ, पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी या विषयाबरोबरच पोषण आहार दरात वाढ, पोषण आहार ट्रॅकिंग ॲप मराठीत असावे याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे तत्कालीन कामगार मंत्री आ. मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यावेळी किमान वेतन यादीमध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस समावेश करण्याची मागणी महासंघाने केली होती. याबाबत आ. मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना बोलवून अशी वाढ केल्यावर शासनावर किती आर्थिक बोजा पडेल याचा अभ्यास करण्यास सांगितले होते. यानंतर तत्कालीन महिला व बालविकास मंत्री आ. यशोमतीताई ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना मानधन वाढ आणि पेन्शनचा प्रस्ताव तयार करण्याचे सूचना दिल्या होत्या. पण दुर्दैवाने या प्रस्तावावर यशोमती ठाकुर यांची सही होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये सरकार बदलले. यानंतर कृती समितीबरोबर नवीन सरकारमधील संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या अनेक बैठका झाल्या. समितीच्या वतीने मुंबई, नागपूर येथे आंदोलने झाली. पण तारीख पे तारीख देत राज्य शासनाकडून या प्रश्नाबाबत चालढकल करण्यात येत आहे.
काहीही झाले तरी आपला प्रश्न सुटावा याकरीता आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आ. पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी, अंगणवाडी महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे, कोल्हापूर जिल्हा सचिव सुवर्णा तळेकर, अंगणवाडी कृती समिती सदस्य एम.ए. पाटील, शुभा रामिन, दिलीप उटाणे, जीवन सुरुडे, सौ. परुळेकर, संगीता पोवार यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.