no images were found
शिराळ्यात आढळले गव्यांचे सहा मृतदेह, वनविभागाकडून गंभीर दखल
शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातल्या रिळे या ठिकाणी एकाच वेळी संशयस्पदरित्या पाच गवे रेडे मृत अवस्थेमध्ये आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी एका गव्याचा मृत्यू झाला होता, त्यामुळे एकूण सहा गवे रेडे मृत्युमुखी पडले आहेत.
सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेल्या शिराळा तालुक्याचा काही भाग सह्याद्रीच्या डोगर रांगेत येतो. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि दाजीपुर अभयारण्य असलेल्या भागातून गावे बाहेर नागरी वस्तीकडे भ्रमंती करतात. आणि शेतपिकांचे नुकसान आणि नागरिकांवर हल्लेही करतात. अशाच तब्बल सहा गव्यांचे मृतदेह शिराळा परिसरात आढळले. रिळे गावा नजीक असणाऱ्या पाटील दरा हद्दीत हे गवे संशयास्पदरित्या मृत अवस्थेत आढळून आले आहेत. मृत ५ गव्यापैकी २ गव्यांचे मृतदेह पूर्ण पणे सडलेल्या अवस्थेत सापडले.ज्यामध्ये तीन मादी आणि दोन नर गव्यांचा समावेश आहे. हे सर्व गवे दीड ते सहा वर्षे वयोगटातील आहेत.
गावातले काही लोक त्याबाजूला गेले असता, त्यांना उग्र स्वरूपाचा वास आला. लोकांनी त्यानंतर शोध घेतला असता, त्यांना झाडांच्या झुडपामध्ये गवा मेलेल्या कुजलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत तातडीने वनविभागाला कळवण्यात आलं. वन विभागाने या ठिकाणी पोहोचत इतरत्र आणखी शोध घेतला असता त्यांना एका मागून एक असे पाच गवे मृत अवस्थेत आढळून आले. त्यापैकी तीन गव्यांच्या मृतदेह हा कुजून गेलेले होते. प्राथमिक तपासामध्ये विषबाधा होऊन गव्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याची गंभीर दाखल घेत वन विभागाकडून या गव्यांचे शविच्छेदन करून दहन करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच रिळे गाव नजीकच्या बिऊर येथे असणाऱ्या तलावाच्या ओघळीत एक नर जातीचा गवा मृत अवस्थेत आढळून आला होता. मात्र, त्याचा मृत्यू हा वार्धक्याने झाल्याचं वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
वन विभागाकडून मृत गव्याचे त्याच ठिकाणी दहन करण्यात आले. याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास माडकर यांनी एकाच वेळी पाच गवे मृत अवस्थेत आढळून आल्याने विषबाधा झाली असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र यातील दोन गव्यांचा पाच तर एका गव्याचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. तर, यापैकी एका गव्याच्या मृतदेहाचे अवशेष आता तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या गव्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे की अन्य कोणत्या कारणातून झाला आहे,हे अहवालानंतरच स्पष्ट होईल,असे सांगितले आहे.