
no images were found
गव्याच्या हल्ल्यात सोहलेवाडी येथील दोन शेतकरी जखमी
आजरा : तालुक्यातील सोहाळे व साळगाव दरम्यानच्या हद्दीतील शेत शिवारात गव्याने शेतकऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला. गव्याने दिलेल्या धडकेत पांडूरंग तुकाराम साबळे (वय ५५) व शामराव गोपाळ दोरुगडे (वय ५५, दोघेही रा.सोहाळे ,दोरुगडेवाडी) हे दोन शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
दोरुगडेवाडी येथील पांडूरंग साबळे, शामराव दोरुगडे, हे शेतकरी महाजन नावाच्या शेतात पिंजर भरण्याचे काम करत होते. दरम्यान जवळच असलेल्या ओढ्यात पाणी पिण्याकरिता आलेल्या गव्याने अचानक शेतकऱ्यांचा पाठलाग केला व प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्या ठिकाणी असलेल्या दुचाकीला गव्याने धडक दिली. गव्याच्या या दहशतीने शेतकऱ्यांनी खबरदारी घेवून त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यामधील पांडूरंग साबळे व शामराव दोरुगडे या दोन शेतकऱ्यांना गव्याने धडक दिली. यामध्ये पांडूरंग साबळे यांच्या पाठीला व शामराव दोरुगडे यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर आजरा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारयांनी जखमींना भेट देवून विचारपूस केली. गव्याने शेतकऱ्यांवर हल्ला केल्याने सोहाळे, सोहाळेवाडी, साळगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.