no images were found
डॉ. खराट हे लोकाभिमुख अधिकारी –डॉ.रत्नाकर पंडित
कोल्हापूर : डॉ. संभाजी खराट हे केवळ शासकीय अधिकारीच होते असे नाही तर ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख अधिकारी होते, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी काढले. विभागीय माहिती कार्यालय (कोल्हापूर) येथील उपसंचालक डॉ. खराट हे 31 जानेवारी रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के होते.
डॉ. पंडित पुढे म्हणाले, डॉ. खराट यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करताना केवळ कर्तव्यालाच प्राधान्य दिले. त्यांच्या ठिकाणी कामाची प्रबळ इच्छा शक्ती होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्यकालात प्रत्येक ठिकाणी कामाच्या रुपाने अमिट ठसा उमटवला.श्री. सोनटक्के म्हणाले, श्री. खराट यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या कालखंडात कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा तसेच पत्रकारांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तर प्रा. डॉ. शिवाजी जाधव म्हणाले, डॉ. खराट यांनी प्रशासन सांभाळताना त्यांच्यातील लेखक, अभ्यासक सदैव जिवंत ठेवला. भविष्यात त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्य कृती निर्माण व्हावी, अशा शुभेच्छाही त्यांनी याप्रसंगी दिल्या.
सत्काराला उत्तर देताना डॉ. खराट म्हणाले, कोणत्याही पदावर काम करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ते काम प्रामाणिक भावनेतून केल्यास त्या कार्यालयाची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माहिती जनसंपर्क विभागात काम करताना व्यापक संपर्क ठेवावा. त्याचबरोबर विभागात वेळोवेळी होणारे बदल आत्मसात करावेत, त्यामुळे कार्यकुशलता वाढेल. केवळ प्रशासकीय कामकाज न पाहता समाजातील चालू घडामोडींकडेही डोळसपणाने पहावे, असे आवाहन करुन विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.