no images were found
INS Vagir पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल
मुंबई : नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर शानदार कार्यक्रमाने INS Vagir ही पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. कलवरी मार्गातील पाणबुड्यांमध्ये या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात नौदलाच्या गस्तीच्या क्षमतेत वाढ होईल.
मुंबईत माझगाव डॉकयार्ड कलवरी मार्गातील पाणबुड्यांची निर्मिती करत आहे. डॉकयार्ड बांधलेल्या कलवरी, खंदेरी, करंज आणि वेला अशा चार पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या होत्या. आता यामध्ये INS Vagir च्या रुपाने ५ व्या पाणबुडीची भर पडली आहे. सहावी आणि कलवरी वर्गातील शेवटची पाणबुडी वगशीर INS Vagsheer पाणबुडीच्या समुद्रातील चाचण्या सुरु असून एप्रिल २०२४ मध्ये अखेरपर्यंत ती नौदलात दाखल होईल असा अंदाज आहे.
या पाणबुडीची वैशिष्टे:- या पाणबुडीची लांबी सुमारे ६७ मीटर असून उंची १२ मीटर तर एकुण वजन सुमारे १७०० टन इतके आहे. कलवरी वर्गातील इतर पाणबुड्यांप्रमाणेच ही पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रिक प्रणालीवर चालते. एका दमात १२ हजार किलोमीटर अंतर पार करण्याची तसेच समुद्रात जास्तीत जास्त ५० दिवस सलग संचार करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. पाण्याखालील लक्ष्याचा भेद करण्यासाठी पाणतीर (torpedo) तर पाण्यावरील किंवा जमिनीवरील लक्ष्याला भेदण्यासाठी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता या पाणबुडीत आहे.