no images were found
गांधीनगरमध्ये बनावट जिन्स विक्रीप्रकरणी कारवाई
गांधीनगर : लिवाईस कंपनीच्या बनावट जिन्सची विक्री गांधीनगर (ता. करवीर) येथे होत असल्याची माहिती मिळताच ३ दुकानांमधून छापा टाकून सुमारे ४१ हजार ५५० रुपयांच्या जिन्स जप्त करण्यात आल्या. सिंधू मार्केट (गांधीनगर) मधील दर्शन कलेक्शन, देवता कलेक्शन आणि रिया गारमेंट या दुकानांवर संजय अरविंद बचानी (वय ५८, रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, येथील काही दुकानांमध्ये लिवाईस कंपनीच्या बनावट जिन्सची विक्री सुरू असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी संजय बचानी यांनी गांधीनगर मार्केटमध्ये येऊन पाहणी केली असता त्यांना दर्शन कलेक्शन, देवता कलेक्शन आणि रिया गारमेंट या दुकानांमध्ये बनावट जिन्सची विक्री सुरु असल्याचे आढळले.
दरम्यान दुकानात छापा टाकल्यानंतर दर्शन कलेक्शनमधून १९ हजार ५०० रुपयांच्या जिन्स, देवता कलेक्शनमधून सुमारे १० हजार रुपयांच्या जिन्स आणि रिया गारमेंटमधून सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या जिन्स जप्त करून या दुकानांचे मालक विकी साजनदास तलरेजा (वय ३९, रा. बॅरेक १६५/८, गांधीनगर), अविनाश विशणदास रोहिडा (वय ३१, रा. बॅरेक नं. १७०/११, गांधीनगर) आणि विष्णू मनोहरलाल डेबानी (वय ३१, रा. बॅरेक नं. ५०/७, गांधीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.