no images were found
काखे येथे लष्करातील जवानाची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या
कोल्हापूर: लष्करात कार्यरत असलेल्या जवानाने सुट्टीवर आल्यानंतर आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सत्यजीत महादेव खुडे (वय २८, रा. काखे, ता. पन्हाळा)या जवानाने आपल्या घरीच आत्महत्या केली. जवानाने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सत्यजितच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
सत्यजीत खुडे हा भारतीय सैन्यात कार्यरत होता. तो गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होता. १ जानेवारीपासून तो आपल्या काखे गावी सुट्टीवर आला होता. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास सत्यजीत दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास भाऊ सुनील हा सत्यजीतला उठविण्यासाठी गेला असता गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. भावाने सत्यजीतला तातडीने उपचारासाठी कोडोली येथील यशवंत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सत्यजितच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक, नैराश्य आणि काहीवेळा शुल्लक कारणातून आत्महत्या केल्याच्या घटना जिल्ह्यात सातत्याने समोर येत आहेत. तुटलेला संवादही आत्महत्यांमागे कारणीभूत ठरत आहे. अगदी किरकोळ कारणातूनही टोकाचे पाऊल उचलले जात आहे.