
no images were found
राष्ट्रपतींच्या पाया पडून प्रोटोकॉलचं उल्लंघन केल्याने महिला अभियंत्याचं तात्काळ निलंबन
जयपूर : एका कार्यक्रमादरम्यान सुरक्षा प्रोटोकॉलचं उल्लंघन करून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजस्थान सरकारमधील एका महिला अभियंत्याला निलंबित करण्यात आलं आहे .
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागानं या महिला अभियंत्याला गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर निलंबित केलं. विभागाचे मुख्य अभियंता (प्रशासन) यांच्या आदेशात म्हटलंय, विभागाच्या कनिष्ठ अभियंता अंबा सियोल यांनी ४ जानेवारीला रोहेत इथं स्काऊट गाईड जांबोरीच्या उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करून प्रोटोकॉल मोडला. त्यांना राजस्थान लोकसेवा नियमांनुसार तत्काळ प्रभावानं निलंबित करण्यात आलंय.
अंबा सियोल ह्या वॉटर सिस्टीम पाहण्यासाठी कार्यक्रमस्थळी आल्या होत्या. परंतु, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या अधिका-यांच्या पुढच्या रांगेत पोहोचण्यासाठी राष्ट्रपतींचा सुरक्षा घेरा फोडण्यात त्यांना यश आलं. त्यांनी पुढं जाऊन राष्ट्रपतींच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु राष्ट्रपतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं. स्थानिक पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयानं ही घटना राष्ट्रपतींच्या सुरक्षेबाबत गंभीर चूक असल्याचं सांगत राजस्थान पोलिसांकडून अहवाल मागवला आहे