
no images were found
पंचगंगेच्या पात्रात मृत माशांचा खच,नदी प्रदुषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
कोल्हापूर : गेल्या आठवडाभरातून जलचरांचा तडफडून मृत्यू सुरुच आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पोकळ आश्वासने, प्रदुषणमुक्तीची गुलाबी स्वप्ने, कारखान्यांकडून सांडपाणी थेट पाण्यात सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यात अक्षरश: विष तयार होत आहे. पाण्यातील ऑक्सिनचे प्रमाण कमी होत चालल्याने लाखो मासे तडफडून मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे परिस्थिती भयावह झाली आहे.
कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगेच्या नदीपात्रात मृत माशांचा खच पडत असतानाच आता शिरोळ तालुक्यातही तीच भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरवाड बंधाऱ्याजवळ लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीच्या प्रदुषणाचा स्तर किती महाभयंकर झाला आहे, याचा अंदाज येतो. वळिवडेत (ता. करवीर) परिसरात पंचगंगेच्या पात्रात मृत माशांच्या खच पडल्याने आता दुर्गंधी पसरु लागली आहे. दरवर्षी होत असलेल्या या प्रकाराने संतापात भर पडत चालली आहे. नदी प्रदुषित करणाऱ्या संबंधितांवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नदीपात्रात मृत मासे तरंगत आहेत.
लाखभर मासे मृत झाल्याने गांधीनगर ग्रामपंचायतीकडून मृत मासे काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहकार्याने वळिवडे येथील सुर्वे बंधारा येथे मासे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन संपत चालल्याने शेकडो जलचरांचा तडफडून मृत्यू होत आहे. शिये-कसबा बावडा मार्गावर पंचगंगा नदी पुलाखाली पात्रात शेकडो माशांचा ऑक्सिजन न मिळाल्याने पाच दिवसांपूर्वी तडफडून मृत्यू झाला. नदी पात्रातील पाणी प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याने मासे मृत होत आहेत. नदी सुद्धा हिरवीगार पडल्याने दुर्गंधीयुक्त पाण्यात शेकडो मासे पाण्यावर येत आहेत. नदीची गटारगंगा होत असतानाही कोणीही दखल घेतलेली नाही. मृत मासे तरंगण्याचा तसेच ऑक्सिजनसाठी माशांनी पाण्यावर येण्याचा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून होत आहे.