
no images were found
मोबाईलवरून आईला त्रास दिल्याने विद्यार्थ्याचा कदमवाडीत शिक्षकावर खुनी हल्ला
कोल्हापूर: मोबाईलवरून आईला अनेकदा त्रास दिल्यामुळेच कदमवाडी येथील शिक्षक संजय आनंदा सुतार (रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांना ठार मारण्याच्या उद्देशानेच कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली हल्लेखोर मुलासह साथीदाराने मंगळवारी पोलिसांना दिली. संशयितांनी दिलेल्या जबाबामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. दोन्हीही हल्लेखोर अल्पवयीन असल्याने सायंकाळी त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, जखमी शिक्षकाची प्रकृती चिंताजनक आहे.
शिक्षकावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयितांना शाहूपुरी पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयताही हस्तगत करण्यात आला आहे. शाळेच्या आवारात शिक्षकावर झालेल्या हल्ल्यामुळे खळबळ उडाली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हल्लेखोराच्या अटकेसाठी व्यापक शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. संशयितांना सकाळी ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ अधिकार्यांनी स्वत: संशयिताकडे चौकशी केली असता दोघांनी कबुली दिली.
संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्याची वेगवेगळ्या स्तरावर चौकशी करण्यात आली. शिक्षक सुतार हे संशयिताच्या आईला मोबाईलद्वारे त्रास देत होते, असे त्यांच्या जबाबातून पुढे आले आहे. काही दिवसांपूर्वी हा प्रकार निदर्शनास आल्याने शिक्षकाविषयी मनात प्रचंड रोष निर्माण झाला होता. शिक्षकाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच प्लॅन करण्यात आला. हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला असावा, या शक्यतेने घटनास्थळावरून पलायन केल्याची कबुलीही संशयिताने दिल्याचे गवळी म्हणाले. कोयत्याने शरीरावर वर्मी हल्ला झाल्यामुळे सुतार यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.