no images were found
एकतर्फी प्रेमातून मुलींना वश करण्यासाठी भानामती केल्याने भीतीचे वातावरण, प्रेमविरांवर कारवाई करण्याची मागणी
कोल्हापूर : शाहूंच्या या पुरोगामी कोल्हापुरात मुलींना वश करण्यासाठी भानामती, करणी असे अघोरी प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. मुलींच्या फोटोंवर हळदी-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू अन् हिरवं कापड ठेवल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. एकतर्फी प्रेमातून असे प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मुलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी विशेषतः निर्भाया पथकाने असा प्रकार करणार्यांवर प्रेमविरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावात हा प्रकार समोर आला आहे. येथे एका गुऱ्हाळघराच्या समोर असलेल्या वडाच्या झाडाखाली मुलीच्या फोटोवर हळदी-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू अन् हिरवं कापड ठेवल्याचं आढळून आलं. असाच प्रकार गावच्या स्मशानभूमीलगतही समोर आला आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी असाच प्रकार पाडळी खुर्द गावात घडला. एकतर्फी प्रेमातून असा निंदनीय व अघोरी प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अशा गोष्टी करण्यामागे नेमका काय उद्देश आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सध्याच्या आधुनिक युगातही अंधश्रेद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना होत असल्याने समाजात अजुनही अंधश्रद्धा फोफावत असल्याचं दिसून येत आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे मुलीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यातच असे अघोरी प्रकार घडल्याने पोलिसांनी विशेषतः निर्भया पथकाने असा प्रकार करणार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.