no images were found
विद्यापीठात १० डिसेंबरला इंटर्नशीप फेअरचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात येत्या शनिवारी (दि. १०) अभिनव अशा ‘इंटर्नशीप फेअर-२०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा सन २०२१ व २०२२मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी खुला आहे, अशी माहिती संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता ओझा यांनी दिली.
डॉ. ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगणकशास्त्र अधिविभागाने विद्यापीठाचा सेंट्रल प्लेसमेंट कक्ष आणि आय.टी. असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘इंटर्नशीप फेअर-२०२२’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये २५हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्याकडे इंटर्नशीप करण्याची संधी या उपक्रमाद्वारे प्राप्त होणार आहे. एम.सीए., एम.एस्सी. (संगणकशास्त्र), एम.एस्सी. टेक. (गणित), एम.ई., एम.टेक., बी.ई., बी.एस्सी., बी.सी.ए. किंवा तत्सम विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहेत. विद्यापीठाव्यतिरिक्त अन्यत्र शिकणारे विद्यार्थीही या मेळाव्यास उपस्थित राहू शकतात. शनिवारी (दि. १०) सकाळी ९ वाजल्यापासून विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभाग इमारतीमधील संगणकशास्त्र अधिविभागात विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी डॉ. ओझा यांच्यासह केंद्रीय रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. जी.एस. राशिनकर, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत. नोंदणी व अधिक माहितीसाठी ०२३१-२६०९३४७ या क्रमांकावर इच्छुकांनी संपर्क साधावा.