no images were found
अदाणी डिफेन्सकडून पोखरण चाचणी क्षेत्रात चार रणगाडाविरोधी (अँटी-टँक) क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण
पोखरण (राजस्थान), : अदाणी समूहाची प्रमुख संरक्षण आणि एरोस्पेस कंपनी अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे वाहनावर बसवण्यात आलेल्या ‘बघीरा AT1’ या रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली.
या चाचणीमध्ये दिवसा आणि रात्री लक्ष्यावर अचूक मारा करण्याची क्षमता तपासण्यात आली. तसेच, चिलखती वाहनाचे लक्ष्य ठेवून एकाच दिशेने दोन क्षेपणास्त्रे सलग डागण्यात आली. याशिवाय, अधिक अंतरावरील हवाई लक्ष्यावरही क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर संपूर्ण क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रदर्शन करण्यात आले.
20 नोव्हेंबर रोजी पोखरण येथे झालेल्या या ‘नो कॉस्ट नो कमिटमेंट’ (NCNC) चाचणीचे निरीक्षण भारतीय लष्कर, लष्करी व्यवहार विभाग आणि संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले.
भारतीय युद्धभूमीच्या गरजा लक्षात घेऊन निर्मिती
‘बघीरा AT1’ ही क्षेपणास्त्र प्रणाली 18 महिन्यांच्या डिझाइन आणि विकास प्रक्रियेतून तयार करण्यात आली आहे. अदाणी डिफेन्सने भारतातील भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि लष्कराच्या गरजा लक्षात घेऊन या प्रणालीत आवश्यक बदल केले आहेत. या संपूर्ण प्रणालीमध्ये क्षेपणास्त्र, स्वयंचलित लॉन्चर, दिवसा आणि रात्री लक्ष्य पाहण्यासाठी विशेष उपकरणांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रणाली अदाणी डिफेन्सने तयार केलेल्या 4×4 प्रकारच्या वेगाने हालचाल करू शकणाऱ्या चिलखती वाहनावर बसवण्यात आली आहे.
– अधिक अंतरावरून मारा करण्याची क्षमता : हे क्षेपणास्त्र 8 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील रणगाड्यांना लक्ष्य करू शकते. ही क्षमता जमिनीवरून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या सुमारे 4 किमी अंतराच्या दुप्पट आहे.
– इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचा परिणाम होत नाही : हे क्षेपणास्त्र रेडिओ लहरींऐवजी लेझर किरणांच्या मदतीने लक्ष्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे युद्धभूमीवर शत्रूकडून होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचा त्यावर फारसा परिणाम होत नाही.
– संरक्षण यंत्रणेला भेदण्याची क्षमता : एकाच लक्ष्यावर एकाच लेझर किरणाच्या दिशेने कमी वेळात एकापाठोपाठ दोन क्षेपणास्त्रे डागता येतात. पहिले क्षेपणास्त्र रणगाड्याची सक्रिय संरक्षण यंत्रणा (APS) निष्क्रिय करण्यासाठी, तर दुसरे क्षेपणास्त्र त्याचे संरक्षण भेदण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
– सलग मारा करण्याची क्षमता : स्वयंचलित लॉन्चरवर एकाच वेळी मारा करण्यासाठी 4 क्षेपणास्त्रे तयार असतात. याशिवाय वाहनात आणखी 8 क्षेपणास्त्रे ठेवता येतात. त्यामुळे एका वाहनातून एकूण 12 क्षेपणास्त्रे डागता येतात.
– दिवसा आणि रात्रीही करण्याची क्षमता: या प्रणालीमध्ये दिवसा लक्ष्य पाहण्यासाठी टीव्ही कॅमेरा आणि रात्री लक्ष्य ओळखण्यासाठी थर्मल इमेजिंग उपकरणे बसवण्यात आली आहे. लक्ष्याचा मागोवा घेण्याची स्वयंचलित सुविधाही यात आहे.
– मारा करून त्वरित ठिकाण बदलण्याची क्षमता : शत्रूच्या नजरेत न येता सुरक्षित ठिकाणाहून क्षेपणास्त्र डागता येते. त्यानंतर शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहन त्वरित दुसऱ्या ठिकाणी हलवता येते.
– हवाई लक्ष्यांवरही मारा : ही प्रणाली अधिक अंतरावरील हवाई लक्ष्यांवरही मारा करू शकते.
भारताची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र क्षमता वाढवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
भारताला आधुनिक रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. सध्या उपलब्ध असलेल्या क्षेपणास्त्रांची संख्या अपुरी असल्याने या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याची आवश्यकता आहे.
भारतीय लष्कराकडे सध्या प्रामुख्याने दुसऱ्या पिढीतील मिलान-2T आणि कॉन्कर्स-M ही क्षेपणास्त्रे आहेत. तातडीच्या लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी त्यानंतर स्पाइक क्षेपणास्त्रांचाही समावेश करण्यात आला. तसेच, भारत जॅव्हलिन क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या प्रक्रियेतही प्रगती करत आहे.
अलीकडील युद्धांमधून रणगाड्यांवरील हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्रांची मारा करण्याची क्षमता आणि वेगाने हालचाल करण्याचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत ‘बघीरा AT1’ हे क्षेपणास्त्र भारतीय लष्कराला लांब पल्ल्याचा आणि वाहनावरून मारा करण्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देते. यामुळे हाताळता येणारी आणि हेलिकॉप्टरमधून डागली जाणारी क्षेपणास्त्रे यांसोबत आणखी एक क्षमता लष्कराला मिळणार आहे.
संरक्षण क्षेत्रातील क्षमता वाढवण्यात खासगी उद्योगांचे योगदान
भारताचे संरक्षण उत्पादन आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये विक्रमी 1.78 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. यामध्ये खासगी क्षेत्राचा वाटा 22 टक्क्यांवरून वाढून 24 टक्के म्हणजेच सुमारे 42 हजार कोटी रुपये झाला आहे. तसेच, भारताची संरक्षण निर्यातही विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
‘बघीरा AT1’ ही प्रणाली भारतातील खासगी कंपन्या आधुनिक संरक्षण प्रणाली विकसित करणे, त्यांची निर्मिती करणे आणि लष्कराच्या गरजांनुसार त्या उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दाखवते. अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसने या संपूर्ण युद्ध प्रणालीची निर्मिती, विविध यंत्रणा एकत्र जोडणे आणि चाचणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला या प्रणालीची क्षमता तपासण्याची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पामुळे भारतातच आधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची निर्मिती, जोडणी आणि देखभाल करण्याची क्षमता वाढेल. तसेच, या क्षेपणास्त्रांमध्ये भारतीय तंत्रज्ञानाचा वापर हळूहळू वाढवता येईल. त्यामुळे गरजेच्या वेळी परदेशातून क्षेपणास्त्रे मागवण्याची गरज कमी होईल.