no images were found
बेसमेंटमधील पाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडल्याप्रकरणी वरद डेव्हलपर्सला १० हजारांचा दंड : नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याच्या तक्रारीनंतर महापालिकेची कारवाई
कोल्हापूर, : महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत सरलष्कर पार्क परिसरात वरद डेव्हलपर्स यांच्यामार्फत अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये साचलेले पाणी मोटार पंपाद्वारे मुख्य रस्त्यावरील गटर व ड्रेनेज लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत होते. त्यामुळे ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होऊन पाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरांमध्ये जात असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विरोधी पक्षनेते राजेश लाटकर व नगरसेविका सौ स्वाती येवलुजे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी पाण्यामुळे रस्ता खराब होत असल्याबाबत तसेच घरांमध्ये पाणी शिरत असल्याबाबत तक्रारी मांडल्या.
या प्रकरणाची दखल घेऊन उपआयुक्त परितोष कंकाळ व सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील यांच्या सूचनेनुसार संबंधित वरद डेव्हलपर्स यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार महापालिकेच्या विभागीय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, आरोग्य निरीक्षक प्रकाश लोंढे व उपद्रव शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी कारवाई केली. यामध्ये वरद डेव्हलपर्सचे संजय चव्हाण यांच्यावर १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एनडीएस पथकाचे रघुनाथ चव्हाण, राजेश पाटील, पांडुरंग घाडगे, अमोल हिंजनाळे, रतिलाल शिंदे, सुरेश चौगुले व अमर सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.