Home Uncategorized ‘एनएसएस’च्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी निश्चितपणे भरीव काम शक्य: मिलींद काळे

‘एनएसएस’च्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी निश्चितपणे भरीव काम शक्य: मिलींद काळे

1 second read
0
0
11

no images were found

‘एनएसएस’च्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी निश्चितपणे भरीव काम शक्य: मिलींद काळे

कोल्हापूर.: राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांकडून केवळ श्रमदान करून घेणे अपेक्षित नसून, त्यांच्याकडील विविध कौशल्यांचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी, विज्ञान, भूगोल, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र आदी विविध शाखांतील विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा उपयोग जलसंधारणाच्या कामासाठी प्रभावीपणे करता येऊ शकतो. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्रातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी निश्चितपणे भरीव काम करू शकते, असा विश्वास राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी मिलींद काळे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मंत्रालय, मुंबई आणि शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठात राज्यातील सर्व कार्यक्रम समन्वयक तथा संचालक यांची तीनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि युनिसेफचे व्यवस्थापक आनंद घोडके प्रमुख उपस्थित होते. कार्यशाळेला राज्यातील विविध विद्यापीठांचे एनएसएस संचालक, समन्वयक उपस्थित होते.

मिलींद काळे म्हणाले, महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे पाच लाख १८ हजार स्वयंसेवकांच्या सामूहिक शक्तीचा उपयोग जलसंधारण आणि दुष्काळमुक्तीसाठी करण्याचे शासनाचे नियोजन आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसार यंदा निवासी शिबिरांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील निवडक गावांमध्ये हे काम करण्यात येईल. जलसंधारणाच्या कामात केवळ शारीरिक श्रमदानापुरता विद्यार्थ्यांचा सहभाग मर्यादित न ठेवता त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा आणि तांत्रिक कौशल्यांचा उपयोग करून घेतल्यास या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल. राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित निवासी शिबिरातील उपक्रम कायम ठेवून श्रमदानाचा कालावधी दोन तासांऐवजी तीन तास करण्यात येणार आहे. तसेच आगामी तीन वर्षांच्या कालावधीत पाणीपातळी वाढविणे आणि गावांना दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विद्यापीठाने ठोस नियोजन व कृती आराखडा तयार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जलसंवर्धन, वन्यजीव संवर्धन आणि पश्चिम घाटातील वनस्पतींचे संवर्धन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणे महत्त्वाचे आहे. ‘पाणी आणि झाडे वाचविली तरच आपण वाचू’ हा संदेश या कार्यशाळेच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम एनएसएसच्या स्वयंसेवकांनी करावे. या तीन दिवसीय कार्यशाळेतून नावीन्यपूर्ण संकल्पना आणि कृतीशील नियोजन पुढे येऊन त्याचा लाभ विद्यार्थ्यांना व समाजाला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

फुले, शाहू, आंबेडकरांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा एनएसएसच्या कामात प्रतिबिंबित होत असल्याचे सांगून अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, आजच्या काळात एनएसएसचे कार्य केवळ स्वच्छता, वृक्षारोपण व रक्तदानापुरते मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धन, हवामान बदल, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, युवकांचे मानसिक आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन अशा नव्या सामाजिक आव्हानांपर्यंत विस्तारले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, एनएसएसच्या कार्याला अभ्यासक्रमाशी जोडून त्याचे शैक्षणिक क्रेडिटमध्ये रूपांतर करण्याबरोबरच उपक्रमांचे डिजिटल दस्तऐवजीकरण व परिणामांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. तसेच, सात दिवसीय शिबिरानंतरही दत्तक गावांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवून ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, उद्योग आणि शासकीय विभागांच्या सहकार्याने गावांच्या विकासासाठी दीर्घकालीन काम करावे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी विकसित गाव ही पहिली पायरी असून, ती उभारण्याची क्षमता एनएसएसच्या स्वयंसेवकांमध्ये असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सेवा सेतू’ पोर्टलचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने ‘सेवा सेतू’ पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. या पोर्टलचे उद्घाटन कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या हस्ते माऊसक्लिकद्वारे करण्यात आले. एनएसएसच्या उपक्रमांचे एकत्रीकरण, दस्तावेजीकरण एकाच मंचावर व्हावे, या दृष्टीने सदरचे पोर्टल उपयुक्त ठरेल. विद्यापीठासह राज्य पातळीवर सर्व आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. कबीर खराडे यांनी केले. सुजीत मुंढे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. कविता वड्राळे यांनी आभार मानले

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला …