Home Uncategorized पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात; दोन आठवड्यांत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात; दोन आठवड्यांत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

1 second read
0
0
5

no images were found

पाच लाख रुपयांची वैयक्तिक भेट नाकारून डॉ. शिवशंकर मरजक्के यांचा गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात; दोन आठवड्यांत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वी

मोयामोया आजारग्रस्त गरीब रुग्णांच्या उपचारांसाठी निधी उभारण्याचा संकल्प; राष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी

कोल्हापूर : परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आशीर्वादाने सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून न्यूरोसर्जरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मेंदूच्या रक्तपुरवठ्याशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियांमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रेन बायपास शस्त्रक्रिया देशातील मोजकेच न्यूरोसर्जन करतात. अशा विशेष शस्त्रक्रियांमध्ये डॉ. मरजक्के यांनी मिळवलेले कौशल्य कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

या कामगिरीचे विशेष महत्त्व अधोरेखित करणारी आणखी एक घटना नुकतीच घडली. कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करीत होते. मात्र, डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आणि त्यांनी उपचारांबाबत दिलेली माहिती समजून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या उपचारांसाठी डॉ. मरजक्के यांच्यावर विश्वास व्यक्त केला.

उपचारांबाबतचे समाधान आणि डॉक्टरांच्या कौशल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुग्णांच्या पालकांनी डॉ. मरजक्के यांना वैयक्तिक भेट म्हणून पाच लाख रुपये देऊ केले. मात्र, डॉ. मरजक्के यांनी ही संपूर्ण रक्कम स्वतःसाठी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. त्याऐवजी मोयामोया (Moyamoya) आजाराने ग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या उपचारांसाठी या रकमेचा उपयोग व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मोयामोया हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित दुर्मिळ व गंभीर आजार असून, त्यावरील उपचार आणि ब्रेन बायपास शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या अनेक रुग्णांना आवश्यक उपचार घेणे शक्य होत नाही. अशा रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र मोयामोया सोसायटीची नोंदणी करणे, रुग्णालयाची या संस्थेशी नोंदणी करणे आणि त्याद्वारे कायमस्वरूपी मदतनिधी (Fund) उभारणे, असा डॉ. मरजक्के यांचा मानस आहे.

या निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत अथवा अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केवळ अत्याधुनिक वैद्यकीय उपचार देणे एवढ्यापुरतीच डॉक्टरांची भूमिका मर्यादित न राहता आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
एका रुग्णाने कृतज्ञतेपोटी दिलेली पाच लाख रुपयांची भेट स्वतःसाठी न स्वीकारता ती समाजातील गरजू रुग्णांच्या हितासाठी वापरण्याचा घेतलेला निर्णय डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्या संवेदनशीलतेची, निःस्वार्थी वृत्तीची आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारा आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्टता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या सेवाकार्याला समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘वैद्यकीय कौशल्यातून जीवनदान आणि सेवाभावातून गरिबांना आधार’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कलाकारांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन प्रवासाला खास बनवणाऱ्या नात्यांचा उत्सव साजरा केला

कलाकारांनी त्यांच्या ऑन-स्क्रीन प्रवासाला खास बनवणाऱ्या नात्यांचा उत्सव साजरा केला  म…