Home Uncategorized दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री व साठवणुकीवर होणार कारवाई : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री व साठवणुकीवर होणार कारवाई : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन

30 second read
0
0
5

no images were found

दिवाळीत अनधिकृत फटाका विक्री व साठवणुकीवर होणार कारवाई : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे नागरिक व व्यापाऱ्यांना आवाहन

कोल्हापूर, : आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांची विक्री व साठवणूक करताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. विनापरवाना फटाका विक्री, अनधिकृत स्टॉलची उभारणी तसेच रहिवासी भागात फटाक्यांची साठवणूक किंवा विक्री आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आला आहे.

            शहरात दिवसेंदिवस आग व आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच नुकतीच हिंगोली शहरातील फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच परवानाधारक व अनधिकृत फटाका विक्रेत्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. फटाके हे अतिशय ज्वलनशील व स्फोटक स्वरूपाचे असल्याने फटाका विक्रीबाबत मा. उच्च न्यायालय, नगरविकास विभाग आणि गृह विभागाने वेळोवेळी दिलेले आदेश व निर्देश तसेच स्फोटक नियम २००८, पर्यावरणविषयक नियम आणि इतर कायदेशीर तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे.

            तात्पुरत्या स्वरूपात फटाका विक्रीसाठी दुकानांसमोर मंडप उभारण्याकरिता महापालिकेकडे अर्ज सादर केले जातात. मात्र जनहित याचिका क्र. १५२/२०१५ अन्वये मा. उच्च न्यायालयाने १७ व २५ ऑक्टोबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार तसेच शासन निर्णय दि. ५ सप्टेंबर २०१६ मधील मुद्दा क्र. २ नुसार सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींमध्ये व गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री आणि साठवणूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

            तरीही शहरातील काही ठिकाणी अनधिकृत स्टॉल उभारण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचे स्टॉल संबंधित विभागीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपल्या स्तरावर तातडीने हटविण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिले आहेत. तसेच रहिवासी भागात किंवा विनापरवाना फटाक्यांची विक्री होत असल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अंतर्गत संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

            त्यामुळे नागरिक, परवानाधारक फटाका विक्रेते आणि संबंधित सर्व घटकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानासह सर्वांगीण उपायांना प्राधान्य -प्रध…