no images were found
विशेष लेख
महात्मा फुले : कृतीशीलतेचे अग्रदूत -डॉ. आलोक जत्राटकर, कोल्हापूर
8698928080
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य महाराष्ट्राच्या समाजजीवनावर आणि एकूणच भारतीय सामाजिक विचारविश्वावर अत्यंत दूरगामी परिणाम करणारे ठरले. क्रांतीबा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण करताना हे प्रकर्षाने जाणवते की, फुले दाम्पत्य केवळ एका काळापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी नव्या युगाचा, नव्या सामाजिक जाणीवेचा आणि नव्या मानवतावादी मूल्यव्यवस्थेचा प्रारंभ केला. त्यांच्या कार्याचा गाभा बुद्धीप्रामाण्यवाद, कृतीशीलता आणि सामाजिक समतेवरील अढळ विश्वास हा होता.
महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शब्दप्रामाण्यवादाला आणि ग्रंथप्रामाण्यवादाला ठाम नकार दिला. समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडे, वर्णवर्चस्ववादी विचार आणि विषमतेच्या रचनेला त्यांनी केवळ वैचारिक विरोध केला नाही, तर त्याला पर्यायी सामाजिक कृतीशीलतेची जोड दिली. समतेच्या, बंधुत्वाच्या, धर्मनिरपेक्षतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना त्यांनी आपल्या कार्यातून मूर्त रूप दिले. आज आपण ज्या मूल्यांना संविधानिक मूल्ये म्हणतो, त्या मूल्यांचा हुंकार फुले यांनीच सर्वप्रथम भरला, असे म्हटले तर अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
फुले यांचा सामाजिक विचार केवळ भाषणापुरता किंवा लेखनापुरता मर्यादित नव्हता; त्याला सातत्याने कृतीची जोड होती. समाजातील विषमता, विशेषतः वर्णवर्चस्व आणि स्त्रीदमन, यांना उत्तर देण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली. शिक्षण हे त्यांच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचे आणि क्रांतिकारी साधन होते. मुलींची शाळा सुरू करणे, सावित्रीबाईंना शिक्षित करून त्यांना शिक्षक म्हणून घडवणे, आणि समाजाचा प्रखर विरोध सहन करत शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवणे, हे केवळ एका कुटुंबाचे कार्य नव्हते, तर एका नव्या युगांतराची सुरुवात होती. सावित्रीबाई फुले या पहिल्या मुख्याध्यापिका ठरल्या, आणि चार मुलींपासून सुरू झालेली शाळा पुढे अठ्ठेचाळीस मुलींवर पोहोचली. त्या मुली केवळ साक्षर झाल्या नाहीत, तर विचार करणाऱ्या, विवेकी बनल्या. हा शिक्षणप्रवाहच पुढे या देशातील सामाजिक परिवर्तनाचा पाया ठरला.
शिक्षणाबरोबरच महात्मा फुले यांनी सामाजिक अनिष्ट रूढी आणि प्रथांविरुद्धही ठाम भूमिका घेतली. केशवपनाच्या अमानवी प्रथेच्या विरोधात त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. आज जरी त्या प्रथेची तीव्रता आपल्या समाजातून जवळजवळ नाहीशी झाली असली, तरी त्या काळात ही कृती अत्यंत क्रांतिकारी होती. ज्या लोकांचा रोजीरोटीचा व्यवसाय या प्रथेशी जोडलेला होता, त्यांनाही विश्वासात घेऊन, त्यांना अन्यायकारी प्रथेविरुद्ध उभे करणे हे फुल्यांच्या सामाजिक समंजसतेचे आणि व्यावहारिक बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण होते.
विधवांचे दुःख, स्त्रियांवरील अन्याय, बालविधवांची केविलवाणी अवस्था, परित्यक्त स्त्रियांचे प्रश्न, या सगळ्या समस्यांकडे फुल्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पाहिले. त्यांनी विधवा विवाहाचा विचार पुढे आणला. बालहत्या प्रतिबंधक गृहांची व्यवस्था उभी केली. ही सर्व कामे त्या काळच्या सामाजिक चौकटीला कडवे आव्हान देणारी होती. या समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला शूद्रातिशूद्रांहूनही हीनतेची वागणूक देण्यात येत असे. त्याला उच्चवर्णीय, ब्राह्मण वर्गातील स्त्रियाही अपवाद नव्हत्या. त्यामुळे जात-धर्मनिरपेक्ष पद्धतीने फुले दांपत्याने महिलांच्या प्रश्नांना कृतीशील पद्धतीने वाचा फोडण्याचे काम केले तसेच त्यांच्यावरील अन्याय निवारणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. फुले यांनी विरोध हा कोणा व्यक्ती अगर जातीधर्म यांना नव्हता, तर विषमतेला जन्म देणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी संघर्ष आरंभला होता.
महात्मा फुले यांचा दृष्टिकोन समग्र आणि समावेशक होता. त्यांच्या मित्रपरिवारात भिडे, भांडारकर, चिपळूणकर, न्यायमूर्ती रानडे इत्यादी अनेक ब्राह्मण विचारवंत, सुधारक आणि सहकारी होते. यावरून त्यांचा संघर्ष कोणत्याही जातीविरुद्ध नव्हता, तर वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध असल्याचे सिद्ध होते. “ख्रिस्त, मांग, महंमद, ब्राह्मण” यांना बंधुपरी हृदयाशी धरावे, असे म्हणणारा हा महामानव व्यक्तिगत द्वेषाने प्रेरित होता, असे म्हणणेच चुकीचे ठरेल. फुले अत्यंत समतावादी, उदार आणि मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते होते.
फुले यांचे लेखनही तितकेच क्रांतिकारी होते. लेखन, चिंतन, वाचन आणि मनन हे त्यांच्या कार्याचे अविभाज्य अंग होते. त्यांनी मराठी भाषेत समाजाला समजेल, भिडेल आणि विचार करायला भाग पाडेल, अशा भाषेत लेखन केले. ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून त्यांनी समाजातील बौद्धिक गुलामगिरीचे, अज्ञानाचे आणि शोषणाचे तटस्थ पण सूक्ष्म आणि तीक्ष्ण विश्लेषण केले. हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील काळ्या (निग्रो) लोकांच्या लढ्याला अर्पण केला, ही बाब त्यांच्या आंतरराष्ट्रीय समतेच्या जाणिवेची साक्ष आहे. जगभर जिथे जिथे शोषित लढत होते, तिथे तिथे फुले मनाने उभे होते. त्या सर्व लढ्यांशी आपले माणुसकीचे नाते जोडत होते. म्हणूनच पुढे नेल्सन मंडेला किंवा बराक ओबामा यांना भारत भेटीदरम्यान ‘गुलामगिरी’ या ग्रंथाची प्रत भेट म्हणून दिली गेली, तेव्हा या विचारांची विश्वात्मकता अधिक ठळकपणाने अधोरेखित झाली.
त्यांचे ‘तृतीय रत्न’ हे आधुनिक मराठीतील पहिले नाटक मानले जाते. ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शेतकऱ्यांचे दैन्य, सावकारी पाश आणि शेतीव्यवस्थेतील अन्याय यांचे सखोल विश्लेषण आढळते. म्हणूनच रामचंद्र गुहा यांनी फुले यांना आदराने “The Radical Agrarian” असे यथोचित संबोधले आहे. फुल्यांचे शेतकरीविषयक चिंतन केवळ सहानुभूतीपुरते नव्हते; ते व्यवस्थात्मक परिवर्तनाची मागणी करणारे होते.
फुल्यांच्या कार्यातील एक अत्यंत महत्त्वाचा, पण अनेकदा दुर्लक्षित राहणारा पैलू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे त्यांचे कार्य. १८८० साली रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणे आणि शिवजयंती सुरू करणे हे त्यांचे राष्ट्रीय स्मृतीचे पुनरुज्जीवन करणारे कार्य होते. संभाजी महाराजांच्या काळानंतर सुमारे दीड-दोनशे वर्षे शिवराय विस्मरणात गेले होते. त्या पार्श्वभूमीवर फुल्यांनी शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा तथा काव्यमय चरित्र लिहून महाराष्ट्राला आपल्या सच्च्या स्वराज्यनायकाची नव्याने आठवण करून दिली. त्या अर्थाने महाराष्ट्रधर्म जागविणारे महात्मा फुले हे आद्य प्रवर्तकच म्हणायला हवेत. आज आपण जेव्हा जेव्हा शिवरायांचा अभिमानाने उद्घोष करतो, तेव्हा तेव्हा त्यासोबत महात्मा फुल्यांचेही स्मरण अनिवार्यपणे करायला हवे.
महात्मा फुले यांनी केवळ सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रातच नव्हे, तर भौतिक बांधकामांमध्येही आपली कृतीशीलता सिद्ध केली. ते पुणे म्युनिसिपालिटीचे कमिशनर आणि बांधकाम ठेकेदारही होते. कात्रजचा जुना बोगदा, खडकवासला धरण, बंडगार्डन पूल अशी आजही भक्कम उभी असलेली कामे त्यांनी साकारली आहेत. त्यात भ्रष्टाचाराचा एकही ठिपका नव्हता. समाजाचा पैसा समाजासाठी वापरला गेला पाहिजे, ही त्यांची ठाम धारणा होती. बांधकाम कसे टिकाऊ, दर्जेदार आणि प्रामाणिक असावे, याची ही उदाहरणे त्यांनी जगाला उभी करून दाखविली आहेत.
फुल्यांच्या विचारविश्वात सत्यशोधक समाजाला विशेष स्थान आहे. हा समाज म्हणजे केवळ संघटना नव्हती, तर सत्याचा शोध घेणारी, विज्ञाननिष्ठा जपणारी आणि कर्मकांडांपासून समाजाला मुक्त करणारी चळवळ होती. फुले यांनी मांडलेली “निर्मिक” ही संकल्पना निसर्गाच्या निर्मितीक्षमतेला आणि नियंत्रणक्षमतेला मान्यता देणारी होती. सत्यधर्म म्हणजे माणुसकी, चांगुलपणा, सामाजिक बंधुभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हीच त्यामागची व्यापक भूमिका होती.
महात्मा फुल्यांच्या समग्र कार्यातून जे फलित दिसते, ते म्हणजे समता, बंधुता, सौहार्द, मानवता आणि विवेक यांची ठाम पायाभरणी. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी विज्ञानवादी आणि सामाजिक न्यायाधिष्ठित परंपरा पुढे नेली, तिचे मूळ महात्मा फुले यांच्या कार्यात खोलवर रुजलेले आहे. म्हणून फुले यांचे स्मरण केवळ ऐतिहासिक आदरांजली म्हणून नव्हे, तर आपल्या वर्तमान सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून करायला हवे.
महात्मा फुले हे एका व्यक्तीचे नाव नाही, तर या देशात उदयास आलेल्या सामाजिक क्रांतीचे, विवेकाच्या उजेडाचे, मानवमुक्तीच्या आणि समतेच्या लढ्याचे नाव आहे. त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि कृतीशीलतेचा वारसा आजही तितकाच प्रेरणादायी आहे. आपण समाजात न्याय, समता आणि मानवी मूल्यांचा आग्रह धरत असू, तर त्या प्रत्येक आग्रहामागे फुल्यांचे स्मरण असलेच पाहिजे. कारण महात्मा फुले केवळ भूतकाळातील सुधारक नव्हेत; तर आजच्या आणि उद्याच्याही सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीचे दिशादर्शक आहेत.
(लेखक फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारकार्याचे अभ्यासक आहेत.) – संकलन जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर