Home Uncategorized भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

1 min read
0
0
5

no images were found

भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – अमित शाह

            हिंदी, मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन नवी मुंबईत हिंदी दिवस २०२६ आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा दिमाखदार शुभारंभ; विविध ॲप्स, पुस्तके आणि शब्दकोश उपक्रमांचे लोकार्पण

ठाणे,: भारतीय भाषांचे संवर्धन, सन्मान आणि विकास हा केंद्र शासनाचा प्रमुख आणि दृढ संकल्प असून सर्व प्रादेशिक भाषा या कमळाच्या विविध पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत. या सर्व समृद्ध भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा ‘मध्यमणी’ बनवूया, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.

    वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस २०२६’ आणि ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, खासदार नरेश म्हस्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजित पवार, राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, व्ही.एल. कांताराव, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज जॉयदीप चट्टोपाध्याय, मिलिंद प्रभाकर सबनीस हे मान्यवर उपस्थित होते.

     केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, राजभाषा संमेलने केवळ राजधानी दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेण्याचा केंद्र शासनाचा निर्णय यशस्वी ठरला असून, या उपक्रमांतर्गत हे सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे.    

       महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी व्यापक स्वरूप देऊन देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना चेतवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वशासनासोबतच स्वधर्म आणि स्वभाषेला अग्रक्रम देत मराठीच्या विकासासाठी राजव्यवहार कोश तयार केला होता. तसेच गुलामगिरीच्या काळात ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’मध्ये रचलेले ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून स्वातंत्र्यलढ्याची राष्ट्रीय उद्घोषणा ठरले होते.

      ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ पूर्ण स्वरूपात सादर करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली आहे, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान देऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचा गौरव केला आहे.

     मातृभाषेचे महत्त्व विषद करताना गृहमंत्री म्हणाले की, मातृभाषा ही मानवी विचारप्रक्रियेचा मूळ पाया असून ती व्यक्तीला स्वतःच्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांशी जोडून ठेवते. याच कारणास्तव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यासोबतच देशाशी नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी अन्य भारतीय भाषा शिकली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजभाषा विभागाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून, भारत सरकारच्या पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना हिंदीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘कंठस्थ २.०’ प्रणाली पाच कोटींपेक्षा अधिक वाक्यांसह उपलब्ध करण्यात आली असून ‘लीला राजभाषा’ व ‘लीला प्रवाह’च्या माध्यमातून भाषा शिक्षणाला गती मिळाली आहे. सुरुवातीला ५१ हजार शब्द असलेला ‘हिंदी शब्दसिंधू’ शब्दकोश आता आठ लाख शब्दांपर्यंत विस्तारला असून २०२९ पर्यंत तो जगातील सर्वांत मोठा शब्दकोश बनेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हिंदी,मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात  सांगितले की, “माझी आई मराठी आहे, मात्र देशातील इतर सर्व भाषा माझ्या मावशीसारख्या आहेत. आईचा गौरव करतानाच मावशीचाही पूर्ण सन्मान राखला पाहिजे.”  तसेच हिंदी, मराठीसह सर्व भारतीय भाषांचा परस्पर आदर करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

    ते म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि शिक्षणाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या उंचावते. भारतीय भाषांचे ज्ञान वाढवूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येईल. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च जागतिक व्यासपीठावर हिंदीतून भाषण करून देशाचा सन्मान वाढवला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. जगातील अनेक प्रगत देश आपापल्या मातृभाषांचा अत्यंत स्वाभिमानाने वापर करतात, त्यामुळे भारतानेही स्वतःच्या समृद्ध भाषांचा दैनंदिन व प्रशासकीय कामकाजात अधिकाधिक वापर केला पाहिजे.

     मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हिंदी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसऱ्या क्रमांकाची भाषा असून तिला लोकभाषेचे व्यापक रूप देण्यात मुंशी प्रेमचंद यांच्यासारख्या साहित्यिकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. प्रेमचंद यांच्या ‘गोदान’सारख्या साहित्यकृतींनी सामान्य माणसाच्या वेदना व संघर्ष प्रभावीपणे मांडले, तर राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर आणि दुष्यंत कुमार यांच्या लेखणीने हिंदी साहित्याला वैचारिक उंची मिळवून दिली. स्वातंत्र्यलढ्यात हिंदीने देशाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या संपर्कभाषेचे कार्य केले.

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हिंदी ही सर्व भारतीय भाषांची सखी असून महाराष्ट्रात या संमेलनाचे आयोजन होणे हा मराठी भाषेचाही मोठा गौरव आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही देवनागरी लिपीत लिहिल्या जाणाऱ्या सख्ख्या भगिनी भाषा आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव यांच्या विचारांनी संपूर्ण देशाला दिशा दिली असून संत नामदेवांच्या रचना गुरु ग्रंथ साहिबमध्ये सन्मानाने समाविष्ट आहेत. २०१४ पूर्वीच्या तुलनेत आज केंद्र सरकारच्या कामकाजात हिंदीचा वापर लक्षणीय वाढला असून, तो केवळ संवादापुरता न राहता विज्ञान, तंत्रज्ञान, पोलीस, कायदा व न्यायव्यवस्थेतही वेगाने वाढला पाहिजे. महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या हिंदी भाषिक नागरिकांनी मराठी भाषेचा आदर करत राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचा हातभार लावला असल्याचे त्यांनी नमूद केले.

     उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर हिंदी दिवस साजरा होणे हा अत्यंत शुभ योग असल्याचे सांगितले. गणेशोत्सव हा समाजातील विघ्ने दूर करून एकात्मता साधणारा उत्सव आहे. भारतात भाषा अनेक असल्या तरी भारतीयांची राष्ट्रीय भावना एकच आहे. प्रशासन, शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानात भारतीय भाषांचा वापर वाढवण्याची मोठी गरज असून, मराठी आणि हिंदी साहित्यात परस्पर अनुवादाची समृद्ध देवाणघेवाण झाली आहे. मुंबई आणि नवी मुंबईसारख्या शहरांमध्ये विविध भाषिक समाज गुण्यागोविंदाने राहत असून हीच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची खरी ओळख आहे. शासनाची भाषा ही क्लिष्ट न राहता सर्वसामान्य माणसाला सहज समजेल अशी सोपी असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

     या भव्य सोहळ्यात केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘राजभाषा भारती’च्या ‘वंदे मातरम्’ विशेषांकासह ‘शिव अनादि, शिव अनंत’, ‘भारतीय ज्ञानतंत्र : स्रोत आणि स्वरूप’, ‘अंधेरों से उजालों तक’ आणि ‘वंदे मातरम् के १५० अध्याय’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. संरक्षण संशोधन व विकास संघटनेने प्रकाशित केलेल्या ‘नवान्वेष : भारतीय ज्ञान परंपरा’ या पुस्तकाचेही विमोचन संपन्न झाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेत सी-डॅकने विकसित केलेले ‘भारतीय बहुभाषिक अनुवाद सारथी’ हे मोबाईल ॲप आणि ‘भाषाकुंज’ या स्वदेशी भाषा डेटा सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

याशिवाय प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांसाठी हिंदी शब्दकोश संसाधन, हिंदी टंकलेखन आणि हिंदी आशुलिपी प्रशिक्षणाचा विशेष शुभारंभ करण्यात आला.   

     वर्ष २०२५-२६ चे मानाचे ‘राजभाषा कीर्ती पुरस्कार’ विविध केंद्रीय मंत्रालये, शासकीय विभाग, बँका आणि सार्वजनिक उपक्रमांना त्यांच्या उत्कृष्ट भाषाविषयक योगदानाबद्दल प्रदान करण्यात आले.

      या उद्घाटन सोहळ्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे तसेच देशभरातून आलेले साहित्यिक, भाषातज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतींने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ…