no images were found
गणेशोत्सव : श्रद्धा, संस्कृती, सामाजिक एकात्मता आणि पर्यावरण संवर्धनाचा महाउत्सव
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान मिळवलेला गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही. तो श्रद्धा, भक्ती, कला, संस्कृती, सामाजिक एकात्मता, राष्ट्रीय भावना आणि जनजागृती यांचा सुंदर संगम आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीपासून सुरु होणारा हा उत्सव घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
“वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।” या मंगलमय प्रार्थनेने प्रत्येक शुभकार्याची सुरुवात केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये श्री गणेशाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. बुद्धी, ज्ञान, विवेक, समृद्धी आणि शुभारंभाची देवता म्हणून श्री गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम श्री गणेशाचे स्मरण करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून आहे.
श्री गणेशाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व:
हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता म्हणून ओळखले जाते. जीवनातील अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठी बुद्धी, संयम आणि विवेक आवश्यक असतो. श्री गणेशाचे व्यक्तिमत्त्व हीच शिकवण देते.
श्री गणेशाच्या रुपामागेही अनेक जीवनमूल्ये दडलेली आहेत. मोठे मस्तक आपल्याला व्यापक आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते. मोठे कान म्हणजे इतरांचे म्हणणे शांतपणे आणि संयमाने ऐकण्याची वृत्ती. लहान डोळे एकाग्रता आणि सूक्ष्म निरीक्षणाची शिकवण देतात. सोंड परिस्थितीनुसार लवचिक राहण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते. मोठे पोट जीवनातील सुख-दुःख स्वीकारण्याची क्षमता दर्शवते. मूषक वाहन- लहान मूषकावर आरूढ असलेले श्री गणेश आपल्याला सांगतात की, कोणतीही व्यक्ती किंवा वस्तू लहान समजू नये. योग्य दिशा आणि प्रयत्न मिळाल्यास प्रत्येकामध्ये मोठी क्षमता असते. अशा अनेक जीवनमूल्यांची शिकवण श्री गणेशाच्या प्रतिमेतून मिळते.
गणेशोत्सवाची प्राचीन परंपरा:
भारतात श्री गणेशाच्या पूजेची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. घराघरांत गणपतीची स्थापना करून पूजा करण्याची परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाला विशेष सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वी हा उत्सव मुख्यतः घरगुती स्वरूपात साजरा केला जात असे. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन गणपतीची स्थापना करत, पूजा-अर्चा करत आणि प्रसादाचे वाटप करत. काळानुसार गणेशोत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा होऊ लागला.
लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव:
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचे विशेष योगदान राहिले आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय समाजात एकत्रितपणे सभा घेण्यावर अनेक मर्यादा होत्या. अशा परिस्थितीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
सन 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप दिले, त्यांच्या दूरदृष्टीमुळे गणेशोत्सव हे समाजजागृतीचे प्रभावी माध्यम बनले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र आले,राष्ट्रीय भावना जागृत झाली, स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली, सामाजिक संवाद वाढला, कला आणि संस्कृतीला व्यासपीठ मिळाले. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आज महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत मोठ्या उत्साहाने सुरू आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव : समाजाला जोडणारा उत्सव :
सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. गावागावांत, शहरांमध्ये आणि विविध भागांत गणेशोत्सव मंडळे स्थापन केली जातात. सार्वजनिक मंडळांमध्ये आकर्षक सजावट, देखावे आणि विविध सामाजिक विषयांवर आधारित संदेश दिले जातात. आज अनेक गणेशोत्सव मंडळे केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत आहेत.
गणेशोत्सव: सामाजिक जनजागृती आणि सामाजिक उपक्रम:
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर जनजागृती केली जाते. अनेक मंडळे पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य जागरुकता, रक्तदान, अवयवदान जनजागृती, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती, डिजिटल साक्षरता अशा अनेक विषयांवर देखावे आणि उपक्रम आयोजित करतात, गणेशोत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येत असल्यामुळे जनजागृतीसाठी हे प्रभावी व्यासपीठ ठरते.
अनेक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारली आहे. उत्सवाच्या काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यामध्ये गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सल्ला दिला जातो. परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती केली जाते. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. गरजू नागरिकांना मदत महणून अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. अशा उपक्रमांमुळे गणेशोत्सवाचा खरा सामाजिक अर्थ अधिक व्यापक बनतो.
गणेशोत्सव आणि कला-संस्कृती:
गणेशोत्सव हा कलाकारांसाठीही मोठा उत्सव आहे. मूर्तिकार, चित्रकार, सजावटकार, संगीतकार आणि विविध कलावंतांना या उत्सवाच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याची संधी मिळते. सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, नृत्य, नाट्यप्रयोग, भजन, कीर्तन, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध कला स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. यामुळे तरुण पिढीला आपल्या कला आणि संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळते.
ढोल-ताशांचा उत्साह:
महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि ढोल-ताशा हे एक अनोखे समीकरण आहे. ढोल-ताशांच्या गजरामुळे उत्सवाला एक वेगळेच सांस्कृतिक वैभव प्राप्त आहे. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपली जाते. अनेक तरुण-तरुणी ढोल-ताशा पथकांमध्ये सहभागी होतात. मात्र उत्सवाचा आनंद घेताना ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव : काळाची गरज
आज पर्यावरण संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. गणेशोत्सव साजरा करताना निसर्गाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. काही गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्यामुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाला हानी होऊ शकते. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी उपाय म्हणून मातीच्या मूर्तींचा वापर, शाडू माती किंवा पर्यावरणास अनुकूल सामग्रीपासून तयार केलेल्या मूर्तींचा वापर करावा. नैसर्गिक रंगांचा वापर, सजावटीमध्ये शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळणे. नैसर्गिक सजावटीला प्राधान्य देणे. फुले, पाने आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा. स्थानिक प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम विसर्जन ठिकाणांचा वापर करावा. फुले आणि पूजा साहित्य पाण्यात न टाकता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
गणेशोत्सव हा केवळ दहा दिवसांचा धार्मिक उत्सव नाही. तो आपल्या संस्कृतीचा, श्रद्धेचा, सामाजिक एकतेचा आणि राष्ट्रीय भावनेचा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचे महान कार्य केले. आज त्या परंपरेला अधिक व्यापक आणि समाजोपयोगी स्वरुप देण्याची जबाबदारी आपली आहे. उत्सव साजरा करताना आनंद आणि भक्ती याबरोबरच सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संरक्षणालाही महत्त्व दिले पाहिजे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सेवा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवू शकतो. चला, आपण सर्वजण संकल्प करुया की- गणेशोत्सव श्रद्धेने साजरा करु, समाजासाठी काहीतरी सकारात्मक कार्य करु, पर्यावरणाचे संरक्षण करु आणि एकता व बंधुभाव जपू.! – रणजित पवार,उपसंपादक– विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर