Home निवड राष्ट्रीय युवा संसदेत डॉ. प्रल्हाद माने यांची समूह समन्वयक व परीक्षक म्हणून निवड

राष्ट्रीय युवा संसदेत डॉ. प्रल्हाद माने यांची समूह समन्वयक व परीक्षक म्हणून निवड

0 second read
0
0
12

no images were found

राष्ट्रीय युवा संसदेत डॉ. प्रल्हाद माने यांची समूह समन्वयक व परीक्षक म्हणून निवड
१८व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक व राष्ट्रीय परीक्षकपदाची जबाबदारी; पाच राज्यांतील सात संस्थांच्या मूल्यांकनाची जबाबदारी
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या १८व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक व राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. संसदीय कार्य मंत्रालयाचे उपसचिव अनिल कुमार यांचे या बाबतचे पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे .
युवाशक्तीमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव दृढ करणे, संसदीय कार्यपद्धतीची माहिती तरुणांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे, या व्यापक उद्देशाने राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचे आयोजन केले जाते. २०२६-२७ या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी देशभरातील सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांची बारा झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक झोनसाठी समूह समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये डॉ. माने यांच्यावर पाच राज्यांतील सात विद्यापीठे व महाविद्यालयांच्या मूल्यांकनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील सेंट्रल युनिव्हर्सिटी, जम्मू राज्यातील जम्मू विद्यापीठ, कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील रेवा विद्यापीठ, आर. व्ही. कॉलेज आणि एन. एम. आय. एम. एस. विद्यापीठ, तामिळनाडूतील अलगप्पा विद्यापीठ तसेच महाराष्ट्रातील वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ या संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे.
डॉ. माने यांनी यापूर्वी १४वी, १५वी, १६वी आणि १७वी राष्ट्रीय युवा संसद स्पर्धांच्या मूल्यांकनात सक्रिय सहभाग घेतला आहे. संसदीय कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या स्पर्धांच्या आयोजन व मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाच्या युवा संसदेने तीन वेळा राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून दिल्लीतील संसद भवन परिसरातील बालयोगी सभागृहात पुरस्कार प्राप्त केले आहेत.
डॉ. माने हे शिवाजी विद्यापीठाच्या नेतृत्व विकास केंद्राचे समन्वयक असून, विद्यार्थी वसतिगृहाचे मुख्य अधीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या विविध समित्यांवर ते सक्रियपणे कार्यरत असून, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या समाजशास्त्र अभ्यास समितीचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…