no images were found
डॉ. प्रीती अदाणी यांनी दीर्घकालीन बदलासाठी परोपकाराचे आवाहन केले; अदाणी फाउंडेशनतर्फे नवी दिल्ली येथे एव्हीपीएन स्वागत समारंभाचे आयोजन
· अदाणी समूहाची सामाजिक कल्याण आणि विकासविषयक शाखा असलेल्या अदाणी फाउंडेशनने भारत मंडपम येथे जवळपास 2,000 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले. हे प्रतिनिधी भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या एव्हीपीएन ग्लोबल कॉन्फरन्स 2026 मध्ये सहभागी झाले आहेत.
· अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी वाढत्या गुंतागुंतीच्या सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि प्रभावी उपाय अधिकाधिक समुदायांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक सहकार्य, परस्पर अनुभवांची देवाणघेवाण आणि भागीदारीचे आवाहन केले.
· अदाणी फाउंडेशनच्या तळागाळातील विकासाच्या 30 वर्षांच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम झाला आहे. फाउंडेशनचे कार्य 22 राज्यांमधील 7,200 हून अधिक गावांपर्यंत आणि 1.3 कोटींपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. तसेच आरोग्यसेवा, कौशल्यविकास आणि उच्च शिक्षणासाठी अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखाली ₹60,000 कोटींची वचनबद्धता करण्यात आली आहे.
नवी दिल्ली, : अदाणी समूहाची सामाजिक कल्याण आणि विकासविषयक शाखा तसेच एव्हीपीएन ग्लोबल कॉन्फरन्स 2026 ची स्ट्रॅटेजिक पार्टनर असलेल्या अदाणी फाउंडेशनने भारत मंडपम येथे जवळपास 2,000 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसाठी स्वागत समारंभाचे आयोजन केले.
एव्हीपीएन हे सामाजिक प्रभावासाठी आशियातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. 43 बाजारपेठांमधील 700 हून अधिक संसाधन पुरवठादार, नवोन्मेषक आणि मध्यस्थ भांडवलाची उभारणी करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात. त्याची 13वी ग्लोबल कॉन्फरन्स प्रथमच भारतात आयोजित करण्यात आली असून, 25–26 ऑगस्ट रोजी जगभरातील जवळपास 2,000 परोपकारी संस्था आणि व्यक्ती, सामाजिक प्रभाव क्षेत्रातील नेते, कॉर्पोरेट्स, धोरणकर्ते आणि विकास क्षेत्रातील नेते एकत्र आले आहेत. भारतात आणि संपूर्ण आशियात समाजाला काहीतरी परत देण्याची आणि समुदायांची सेवा करण्याची संकल्पना सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात दीर्घकाळापासून रुजलेली आहे. त्यामुळे या प्रदेशात परोपकाराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मेळाव्याचे स्वागत करताना अदाणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी एकमेकांकडून शिकण्याचे आणि वाढत्या गुंतागुंतीच्या सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भागीदारी निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
“जग भारत आणि आशियाकडे विकास आणि संधीचे उदयोन्मुख केंद्र म्हणून पाहत असताना, जगभरातील परोपकार क्षेत्रातील नेत्यांचे भारतात स्वागत करणे हा आमच्यासाठी विशेष सन्मान आहे. अदाणी फाउंडेशनच्या तीन दशकांच्या प्रवासातून आम्ही शिकलो आहोत की, समुदायांना त्यांचे भविष्य स्वतः घडविण्यास सक्षम केल्यानेच दीर्घकालीन बदल घडतो. सामाजिक आव्हाने अधिक गुंतागुंतीची होत असताना, आपण एकमेकांकडून शिकले पाहिजे, जे प्रभावी ठरते ते सामायिक केले पाहिजे आणि परिणाम अधिक व्यापक करण्यासाठी भागीदारी निर्माण केली पाहिजे. भारताचा तळागाळातील अनुभव सामायिक करण्याबरोबरच आशिया आणि जगभरातील प्रेरणादायी कल्पनांमधून शिकण्याची उत्तम संधी एव्हीपीएन आपल्याला उपलब्ध करून देते,” असे डॉ. अदाणी यांनी सांगितले.
अदाणी फाउंडेशनच्या भारतभरातील 30 वर्षांच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 11 ऑगस्ट 1996 रोजी स्थापन झालेल्या या फाउंडेशनचे कार्यक्रम शिक्षण, आरोग्यसेवा, कौशल्यविकास, उपजीविका, दिव्यांग समावेशन, सामुदायिक पायाभूत सुविधा, क्रीडा आणि तळागाळातील हवामानविषयक कृती अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. तीन दशकांमध्ये फाउंडेशनचे कार्य 22 राज्यांमधील 7,200 हून अधिक गावांपर्यंत पोहोचले असून, त्याचा सकारात्मक परिणाम 1.3 कोटींपेक्षा अधिक नागरिकांवर झाला आहे. फाउंडेशन सामाजिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील आपले कार्यही विस्तारत आहे.
अदाणी समूहाचे अध्यक्ष श्री. गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखाली अदाणी कुटुंबाने आरोग्यसेवा, कौशल्यविकास आणि उच्च शिक्षणासाठी ₹60,000 कोटी (अंदाजे 7 अब्ज डॉलर) देण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे. या वचनबद्धतेचा महत्त्वाचा भाग म्हणजे अदाणी हेल्थ सिटीज. यामध्ये 1,000 खाटांची रुग्णालये, संशोधन सुविधा आणि वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या एकात्मिक आरोग्य परिसंस्थेची संकल्पना करण्यात आली आहे. याचा पहिला टप्पा मुंबई आणि अहमदाबाद येथे साकारला जात आहे, तर फाउंडेशन बिहारमधील पीरपैंती येथे 200 खाटांचे रुग्णालय उभारणार आहे. या वचनबद्धतेमध्ये नेत्रसेवा, व्यावसायिक कौशल्यविकास आणि उच्च शिक्षणासाठी नेत्रविज्ञान प्रशिक्षण तसेच कर्म शिक्षा, अदाणी सक्षम आणि अहमदाबादमधील अदाणी विद्यापीठ यांसारख्या उपक्रमांद्वारे गुंतवणुकीचाही समावेश आहे. फाउंडेशनचा महिला नेतृत्वाखालील उद्योजकता कार्यक्रम संपूर्ण भारतातील 10 लाखांहून अधिक महिला उद्योजकांना सक्षम करण्याच्या दिशेने कार्यरत आहे.
हा सहभाग हाँगकाँग येथे झालेल्या एव्हीपीएन ग्लोबल कॉन्फरन्स 2025 मध्ये सुरू झालेल्या चर्चेलाही पुढे नेतो. त्यावेळी डॉ. अदाणी यांनी आशियातील परोपकार क्षेत्रातील अनुभव आणि ज्ञान एकत्र जोडण्यासाठी युनिफाइड कोलॅबोरेशन प्लॅटफॉर्मची संकल्पना मांडली.