Home Uncategorized पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

3 second read
0
0
5

no images were found

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या -पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 राज्यातील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या क्षमतेची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

 मुंबई, :  कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उभारण्यात येत असलेल्या सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी. तसेच या कामास उशीर का झाला, याचा अहवाल देण्याचे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. तसेच कोल्हापूरसह राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रेड झोन, साखर कारखाने, प्रदुषित क्षेत्रातील सर्व सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची क्षमता, प्रत्यक्ष वापर, तसेच या प्रकल्पांचा वापर करणे अपेक्षित असलेल्या आणि प्रत्यक्ष वापर करणाऱ्या औद्योगिक घटक यांची पाहणी करून त्याचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी. दिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणासंदर्भात श्रीमती मुंडे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार आदी उपस्थित होते. तर राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी तसेच कोल्हापूर महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड आदी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

कोल्हापूरमधील पंचगंगा नदीमध्ये होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तसेच कोल्हापूर शहर, इचलकरंजी तसेच नदी परिसरातील, नगरपालिका, ग्रामपंचायती तसेच औद्योगिक क्षेत्रातून पंचगंगा नदीमध्ये जाणाऱ्या सांडपाण्यामुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आढावा घेण्यात आला.

प्रस्तावित नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या कामामध्ये पंचगंगा नदीचे प्राधान्याने समावेश करून कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगून श्रीमती मुंडे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत सुरू असलेली मंजूर सामूहिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची यांत्रिकीकरणाची कामे आणि त्यांना जोडणाऱ्या पाइपलाइनची कामे एकाच वेळी सुरू राहिली पाहिजेत. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधितांना आदेश जारी करून त्याची प्रत सादर करावी. औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया झाली तरी त्याची विल्हेवाट लावताना ते शेतजमिनी, नाले अथवा अन्य मार्गांनी पुन्हा नदीत पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ प्रक्रिया प्रकल्पांचे निष्कर्ष न पाहता सांडपाण्याची प्रत्यक्ष विल्हेवाट, वाहतुकीदरम्यान होणारी गळती आणि अनधिकृत विसर्ग यावरही प्रभावी देखरेख ठेवण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील सर्वच ठिकाणी असलेले सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रत्यक्षात किती क्षमतेने सुरू आहेत आणि औद्योगिक युनिट्सकडून त्यांचा किती वापर केला जातो, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात यावी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या चार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कोल्हापूरच्या परिघीय शहरी गावांमधील सांडपाणी व्यवस्थापनासाठी संबंधित विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. विविध विभागांच्या अभिसरणातून या गावांसाठी योजना तयार करण्याच्या शक्यतांचा विचार करावा, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

पंचगंगा नदीच्या प्रदुषणासंदर्भात पुढील आठवड्यात कोल्हापूर येथे बैठक घेणार असल्याचेही श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, अनेक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी खराब असते. त्यामुळे त्या पाण्याचा वापर होऊ शकत नाही. त्यामुळे राज्यातील अनेक केंद्रीभूत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी त्या दर्जाचे आहे का?, तसेच हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत का याची पाहणी करणे आवश्यक आहे. तसेच किती औद्योगिक पाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते याचे सर्वेक्षण करण्यात यावे.

यावेळी आमदार श्री. अमल महाडिक, श्री. राहूल आवाडे, श्री. राजेंद्र यड्रावकर तसेच माजी खासदार राजू शेट्टी आदींनीही नदी प्रदुषणासंदर्भात चर्चा केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या̵…