no images were found
कोल्हापूर आयटी चे डेस्टिनेशन होण्यासाठी प्रयत्न करुया-जिल्हाधिकारी डॉ. राठोड
कोल्हापूर:-कोल्हापुरात रस्ते, विमान सेवांचा विस्तार होत असून उद्योगधंद्यांची निर्मिती आणि वाढीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण निर्माण होत आहे. स्थानिक उद्योग व उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर चर्चा विचार विनिमय होऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदा घेण्यात येत आहेत. तर उद्योग मित्र बैठकीच्या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीसाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया. उद्योजकांनी शासनाच्या उद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधावी, असे आवाहन करुन ते म्हणाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक तयार करून स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रयत्न करूया, जेणेकरून कोल्हापूर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे डेस्टिनेशन होईल.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड पुढे म्हणाले, 2025 मध्ये 4 हजार 156 कोटींची गुंतवणूक झाली. 147 उद्योगांची सामंजस्य करार करण्यात आले. यापैकी 88 उद्योग घटकांचे उत्पादन सुरू झाले. यातून 1 हजार 489 कोटींची गुंतवणूक आणि 3 हजार 465 रोजगार निर्माण झाले आहेत. यावर्षी 2026 मध्ये 6 हजार 105 कोटींची गुंतवणूक झाली असून यातून 20 हजार 835 रोजगार निर्मिती होईल.
सर्किट बेंच अंबाबाई विकास आराखड्याच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात होणारी गुंतवणूक ही या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत सुरेंद्र जैन यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात सूक्ष्म , लघू, मध्यम व मोठ्या उद्योगांसाठी आणि विस्तार करणाऱ्या उद्योगांसाठी सुद्धा मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. उद्योगांना भांडवल आणि बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि उद्योगांचा विस्तार व्हावा, यासाठी शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून प्रगती साधावी, असे आवाहन संदीप रोकडे यांनी केले.
सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक दृष्ट्या समृद्ध जिल्हा असण्याबरोबरच उद्योग व्यापार व अन्य विविध क्षेत्रातही कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. शासन प्रशासन उद्योजक बँका औद्योगिक संघटना यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण निर्माण करुया, असे आवाहन करुन जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेबाबत माहिती दिली . सन 2024 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 531 कोटींची गुंतवणूक झाली. यातील 52 उद्योगांशी सामंजस्य करार झाले, त्यापैकी 47 उद्योगांचे उत्पादन सुरू झाले यातून 1 हजार 165 कोटींची गुंतवणूक आणि 2 हजार 659 रोजगारांची निर्मिती झाली असून यावर्षीही कोट्यवधींची गुंतवणूक उद्योग क्षेत्रात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेमध्ये उद्योग क्षेत्रातील तज्ञ व यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील मान्यवर व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.