no images were found
शेतकऱ्याने केवळ उत्पादक न राहता प्रक्रियादार व निर्यातदार व्हावे – पणन मंत्री जयकुमार रावल
कोल्हापूर : शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही तर तो आपल्या शेतमालाचा प्रक्रियादार, ब्रँड अम्बॅसिटर आणि निर्यातदार झाला पाहिजे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खासगी कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गटांची स्थापना करावी. शासन त्यांना सर्वोतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती जयसिंगपूर यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन इमारतीचा प्लिंथ (जोता) काँक्रिटीकरण कामाचा व व्यापारी गाळे बांधकामाच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कामाचा शुभारंभ पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने, जयसिंगपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, रजनीताई मगदूम, सावकर मादनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चव्हाण, उपसभापती माधुरी सावगावे, माजी सभापती सुभाषसिंह रजपूत, सचिव सुनील गावडे यांच्यासह सभासद, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, शेतीमालावर अधारित पिकांची मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी राज्यात आशियाई बँकेच्या माध्यमातून महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या योजनेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प सुरु करण्यात येत आहेत. यासाठी जवळपास 2 हजार 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिरोळ सारख्या प्रगतशील तालुक्यामध्ये असे प्रकल्प सुरु झाले पाहिजेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी शासनामार्फत मदत केली जाते. यामध्ये विविध फळे व भाजीपालांसाठी काढणी पश्चात सुविधा, प्रक्रिया आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मदत केली जाते असे सांगून ते म्हणाले, या योजनेसाठी जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रस्ताव तयार करावा, त्याचबरोबर आधुनिक कोल्ड चेन, ग्रेडिंग पॅकिंगची व्यवस्था, ई-लिलावाची व्यवस्था, डिजिटल बाजारभाव उपलब्ध करुन देणे, अशा प्रकारचे प्रकल्प जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने किंवा शेतकरी उत्पादन कंपनी, उद्योजक किंवा स्वत: शेतकरी यांनी पणन विभागाकडे पाठवावेत, त्यासाठी त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अशा महत्वकांक्षी योजनांचा समावेश आहे. याबरोबरच मोफत वीज उपलब्ध करुन देणे, किसान क्रेडिट कार्ड, डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री कुसुम योजना, कृषी पायाभूत योजना, ई-नाम अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहेत. जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्र शासनामार्फत वाधवणच्या बंधरावर स्थापन केली जात आहे. जवळपास 1300 एकरवर ही बाजार समिती असून त्यासाठी जवळपास 8 ते 10 हजार कोटीं रुपयांचा निधी शासन देणार आहे. या सगळ्या योजनेचा उद्देश केवळ शेतकऱ्याला आर्थिक मदत करणे हा नसून त्याला संकटातून बाहेर काढून अधुनिक तंत्रज्ञान, सिंचन, प्रक्रीया, साठवणूक आणि जागतिक बाजारपेठेशी जोडणे हा आहे.
यावेळी श्री. रावल यांनी राजर्षी छत्रपती शाहू महारांजानी शिक्षण, आरक्षण, सहकार, सिंचन, उद्योग आणि शेतकरी कल्याणासाठी दूरदृष्टीने कार्य केल्याने कोल्हापूर जिल्हा हा ऊस, गुळ, दुध भाजीपाला अशा कृषी पुरक व्यवसासाठी महाराष्ट्रात अग्रेसर असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुभाषसिंह रजपूत यांनी आपल्या मनोगतामध्ये जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा मागणी केली.