
no images were found
मातंग समाजासाठीच्या थेट कर्ज योजनेच्या मर्यादेत एक लाखापर्यंत वाढ
कोल्हापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) कोल्हापूर मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा 25 हजारावरुन एक लाखापर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टि.आर.शिंदे यांनी दिली आहे.
थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रक्कम एक लाख रुपये करण्यात आली असून यामध्ये महामंडळाचा हिस्सा रु.85 हजार (85 टक्के), अनुदान रक्कम रु. 10 हजार (10 टक्के), अर्जदाराचा सहभाग रु. 5 हजार (5 टक्के) असे एकूण 1 लाख रुपये (100 टक्के). 3 वर्ष (36 महिने) या कालावधीसाठी द.सा.द.शे.4 टक्के व्याज दराप्रमाणे कर्ज रक्कम वितरीत करण्यात येणार आहे. योजने अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प मर्यादेपर्यंत असलेले लघु उद्योग करता येतील. जिल्हा कार्यालयामार्फत थेट कर्ज योजनेमध्ये कर्ज मागणी अर्ज वितरण दिनांक 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. परिपूर्ण अर्ज दिनांक 28 नोव्हेंबर ते 20 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक मांग, मातंग, मिनीदीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी,राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू व होतकरुंनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3रा मजला, ताराराणी पुतळ्याजवळ, शहरबाजार, बाबर हॉस्पिटलच्यामागे 416602 येथे मुळ जातीचा दाखला, आधारकार्ड व इतर कागदपत्रासह स्वत: उपस्थित रहावे. त्रयस्थांकडे अर्ज दिला जाणार नाही किंवा अर्ज स्विकारला जाणार नाही. यासाठी कार्यालयात स्वत: प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक आहे, अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2663916 या क्रमांकावर संपर्क साधावा.